तीन दिवसांत २०,४६७ नागरिकांची भेट
ठाणे: ‘क्रेडाई-एमसीएचआय ‘तर्फे बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काऊंटीमध्ये सुरू असलेल्या २३ व्या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनास गेल्या तीन दिवसांत २०,४६७ नागरिकांनी भेट दिली असून, २३४ नागरिकांनी आपल्या स्वप्नातील घराची नोंदणी केली. या प्रदर्शनात ३९८ कोटी रुपयांचे कर्जप्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
या प्रतिसादाबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी, सचिव फैय्याज विराणी आणि प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर यांनी ग्राहकांचे आभार मानले आहेत. या प्रदर्शनात ठाण्यातील ४० हून अधिक आघाडीच्या विकसकांचे १०० हून अधिक रेरा-मान्यताप्राप्त गृह प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यात ५५ लाख रुपयांच्या वन बीएचकेपासून प्रीमियम दर्जाच्या फोर बीएचके प्रशस्त निवासस्थानांचा समावेश होता.
या प्रदर्शनात घोडबंदर रोड, कोलशेत, पोखरण आणि माजिवडा येथील मालमत्तांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. जुन्या ठाणे शहरातील पुनर्विकासाच्या मालमत्तेतही ग्राहकांनी औत्सूक्य दाखविले. किमान ५५ लाख ते दोन कोटी २५ लाखांपर्यंतच्या घरांना सर्वाधिक मागणी आढळली. काही वैशिष्ट्यपूर्ण ऑफर्समुळे अनेक ग्राहकांनी घरांची थेट नोंदणी केली. या प्रदर्शनात स्टेट बँक, यूनियन बँकेसह काही बँका व वित्तसंस्थांची दालने होती. त्यात अनेक ग्राहकांच्या कर्जपुरवठ्यावरील अर्जावर तातडीने प्रक्रिया सुरू करण्यात आली.
घरखरेदीचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिल्यांदाच प्रदर्शनात आलेल्या अनेक कुटुंबांचे घर खरेदीचे स्वप्न साकार झाले. त्यासाठी प्रदर्शनातील विधी व वास्तूविषयक मार्गदर्शन करणाऱ्या दालनांचीही ग्राहकांना मदत झाली. तर शेकडो कुटुंबांनी प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन सुविधांची माहिती घेतली. या कुटुंबाकडून लवकरच घरखरेदी होण्याची अपेक्षा आहे. ठाणे शहरातील नियोजित ठाणे-बोरिवली बोगदा, मेट्रो, कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनच्या स्थानकाच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला अनिवासी भारतीय व गुंतवणूकदारांकडूनही लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक निवासी घरे व व्यावसायिक मालमत्तांची विक्री ठाणे शहरात होते. ठाणे शहरात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या असून, त्याचा नागरिकांना लाभ होत आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या ठाणे शहरात उत्तम जीवनशैली आहे. त्यामुळे ठाणे हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक आदर्श शहर म्हणून उदयाला आले आहे, असा विश्वास व्यक्त करीत अध्यक्ष सचिन मिराणी यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले.
महारेरा मान्यताप्राप्त प्रकल्प व प्रॉपर्टी प्रदर्शनातील विश्वासार्ह विकसकांमुळे घरखरेदीला प्रतिसाद मिळाला, अशी माहिती अध्यक्ष सचिन मिराणी यांनी दिली.
प्रॉपर्टी प्रदर्शनात समावेश असलेले पारदर्शक गृहप्रकल्प, विविध सोयिस्कर पर्याय आणि कर्जपुरवठ्याच्या सुविधेमुळे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी प्रतिक्रिया सचिव फैय्याज विराणी यांनी दिली. या प्रदर्शनाच्या यशाबद्दल ग्राहकांबरोबरच विकसक आणि बँकेचे प्रतिनिधींचे आभारी असून, यापुढील काळातही ‘क्रेडाई-एमसीएचआय’च्या माध्यमातून ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू, असे ते म्हणाले.