डीटीडीसी संघाला विजेतेपद; ठाणे महापालिका संघ गारद

ठाणेवैभव आंतरकार्यालयीन करंडक

ठाणे: दादोजी कोंडदेव मैदानात झालेल्या अ गटातील अंतिम सामन्यात डीटीडीसी संघाने ठाणे महापालिका संघावर ४१ धावांनी विजय मिळवला.

ठाणेवैभव आंतरकार्यालयीन करंडक स्पर्धेच्या अ गटातील अंतिम सामन्यात डीटीडीसी आणि ठाणे महापालिका हे दोन संघ झुंजले. डीटीडीसी संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. आघाडीवीर सार्थ वाघेला अवघ्या सहा धावा करून तंबूत परतला. विराज जाधवने सुरक्षित फलंदाजी करत ६४ धावा केल्या. यात एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. तर अनिष चौधरी २९, अजित यादव २७, गौतम वाघेला २० आणि विनय कुंवर याने १९ धावांचे जेमतेम योगदान दिले. संघातील सहा फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. त्यामुळे डीटीडीसीला ३३.१ षटकांत सर्व गडी बाद १९७ धावांचे आव्हान उभे करता आले. ठाणे महापालिकेच्या संघाकडून अमित पांडे आणि शशिकांत कदम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

ठाणे महापालिकेच्या संघाला हे माफक आव्हानही पेलता आले नाही. आघाडीवर सौरभ आंब्रे आणि विशाल रंगलानी यांनी प्रत्येकी २३ धावा करत निराशा केली. त्यानंतर चार फलंदाजांनी अवघ्या १३ धावा घेत तंबूचा रस्ता धरला. शशिकांत कदम याने मात्र संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. चार षटकार आणि दोन चौकार ठोकत त्याने दमदार ५५ धावा केल्या. मात्र डीटीडीसी संघाच्या अंकित सिंगने त्याला राजेश सरदारकरवी झेलबाद केले. त्यामुळे आत्मविश्वास डळमळलेल्या शेवटच्या चार फलंदाजांनी जेमतेम ३१ धावांचे योगदान दिले. ठाणे महापालिकेच्या संघाने सर्व गडी बाद १५६ धावांपर्यंत मजल मारली. डीटीडीसी संघाच्या राजेश सरदारने २७ धावा देत चार गडी बाद केले. तर वेदांत सकपाळने दोन गडी बाद केले. डीटीडीसीचा विराज जाधव सामनावीर ठरला.