मंत्री आशिष शेलार यांचे कौतुकोद्गार
सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव करंडक स्पर्धेचा सांगता सोहळा दिमाखात
ठाणे: “ठाणेवैभव करंडक स्पर्धेस पॉली उम्रीगर, एकनाथ सोलकर अशा दिग्गज खेळाडूंचा स्पर्श झाला, १९८३च्या विश्वचषकातील बलविंदर संधू या स्पर्धेत खेळला. ज्या स्पर्धेचा इतिहास एवढा उज्ज्वल आहे, त्या स्पर्धेचे भवितव्यही उज्ज्वल आहे”, असे कौतुकोद्गार उच्च तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काढले.

सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात उपस्थित मंत्री श्री.शेलार खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार ऍड.निरंजन डावखरे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ, व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते. श्री.शेलार म्हणाले, “मी क्रिकेटवर प्रेम करणारा माणूस आहे. ठाण्यातील चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेणारा माणूस आहे. त्यामुळेच मी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलो. ठाणेवैभवने लेखणीच्या माध्यमातून ठाणे शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राला गवसणी घातली. चोखंदळ वाचकांपर्यंत गेली ५० वर्षे प्रमाणिकतेने विचार पोहोचवले. बल्लाळ कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी ही परंपरा जपली. त्यामुळे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बळ मिळते, आपण योग्य दिशेने काम करत आहोत ना, याचे उत्तर मिळते”, अशा भावना श्री. शेलार यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, “ठाणेवैभव करंडक स्पर्धेला पॉली उम्रीगर, एकनाथ सोलकर अशा दिग्गज खेळाडूंचा सहवास लाभला. या स्पर्धेत खेळलेला बलविंदर संधू १९८३च्या विश्वचषकाचा मानकरी ठरला. यावरून या स्पर्धेची महती सिद्ध होते. या स्पर्धेचा इतिहास उज्ज्वल असल्याने तिचे भवितव्यही उज्ज्वल आहे,” अशा शब्दांत श्री.शेलार यांनी स्पर्धेचे कौतुक केले.

आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ” ठाणेवैभव करंडक ही केवळ स्पर्धा नसून एक चळवळ आहे. गेली ५० वर्षे या स्पर्धेने सातत्य राखले, यामागे बल्लाळ कुटुंबियांची तपश्चर्या, मेहनत आणि सांघिक कार्य आहे”, असे उद्गार श्री.डावखरे यांनी काढले. “प्रत्येक पिढीनंतर लोकांच्या अपेक्षा वाढत असतात. त्यामुळे ते आव्हान मोठे असते. ‘ठाणेवैभव’कार नरेंद्र बल्लाळ यांच्यानंतर श्री.मिलिन्द बल्लाळ यांनी हे आव्हान लीलया पेलले. तर निखिल बल्लाळ आणि जुईली बल्लाळ यांनी ही स्पर्धा आणि ठाणेवैभव एक टप्पा पुढे नेऊन ठेवला आहे”, अशा शब्दांत श्री.डावखरे यांनी कौतुक केले

‘ठाणेवैभव’ने क्रिकेट स्पर्धांचे सातत्यपूर्ण आयोजन करून पत्रकारितेस एक नवा आयाम दिला, असे सांगून ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी ५० वर्षांत शेकडो क्रिकेटपटूंना केवळ खेळण्याची संधीच मिळवून दिली नाही तर त्यांना रोजगारही मिळवून दिला, असे म्हटले. क्रिकेटमुळे कामगार-व्यवस्थापन संबंध सलोख्याचे झाले तर मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या क्रिकेटपटूंना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ‘ठाणेवैभव’ने केले. श्री.बल्लाळ यांनी दिग्गज माजी क्रिकेटपटूंची जंत्रीच वाचून दाखवली, ज्यांनी या स्पर्धेला आशीर्वाद दिला. ‘ठाणेवैभव’कार नरेंद्र बल्लाळ आणि प्रभाकर गुजराथी यांचे स्मरण त्यांनी केले.
यावेळी श्री. प्रल्हाद नाखवा यांचा यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुईली बल्लाळ-कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन निखिल बल्लाळ यांनी केले.