टीजेएसबी बँकेचा व्यवसाय २५ हजार कोटींच्या पुढे!

ठाणे: देशातील चौथ्या क्रमांकाची बहुराज्जीय सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने ३१ मार्च २०२६ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षासाठी आपले लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मागील १५ वर्षांप्रमाणे यंदाही १० एप्रिल रोजी लेखा परिक्षित निकाल जाहीर करण्याची परंपरा बँकेने कायम ठेवली आहे.

एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत बँकेने आपल्या ५४व्या वर्षात एकूण व्यवसायाचे २५ हजार कोटींचे उद्दिष्ट पार केले आहे. राजस्थान आणि छत्तीसगड या दोन नवीन राज्यांमध्ये विस्तार करून बहुराज्जीय सहकारी बँक म्हणून आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे. वर्षभरात नवीन शाखा सुरू करणे आणि धोरणात्मक विलीनीकरणांमुळे बँकेच्या एकूण शाखांची संख्या आता १६५ झालेली आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये बँकेचा एकूण व्यवसाय २५,३६० कोटी इतका नोंदविण्यात आला असून, यात १६,२४४ कोटी ठेवी आणि ९,११६ कोटी कर्ज वाटपाचा समावेश आहे. बँकेने २८७ कोटींचा एकूण नफा तर १५५ कोटींचा निव्वळ नफा नोंदविला आहे.

बँकेची एकूण अनुत्पादित कर्जे ३.११टक्के तर निव्वळ अनुत्पादित कर्जे शून्य टक्के इतकी आहेत,. हे बँकेच्या शिस्तबद्ध कर्ज व्यवस्थापन आणि प्रभावी वसूली व्यवस्थेचे यश आहे.

पत्रकार परिषदेत अध्यक्ष शरद गांगल म्हणाले, २५ हजार कोटींचा एकूण व्यवसाय टप्पा ओलांडणे हे टीजेएसबी बँकेसाठी अभिमानास्पद आहे. बँकेची ही प्रगती ग्राहकांच्या विश्वासासह योजनाबद्ध विस्ताराच्या धोरणाचे द्योतक आहे. आम्ही शाश्वत वाढ आणि पारदर्शी, कार्यक्षम प्रशासकीय कामकाजासाठी कटिबद्ध आहोत; असेही अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले.

उपाध्यक्ष सीए वैभव सिंगवी म्हणाले, या वर्षातील आमची आर्थिक कामगिरी सातत्य आणि संतुलन दर्शविते. भक्कम भांडवली पर्याप्तता आणि स्थिर मालमत्ता गुणवत्ता याच्या आधारे हे साध्य झाले आहे. व्यावसायिक जोखीम व्यवस्थापनाची शिस्त पाळली आहे. बँकेच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांचा विश्वास टिकवून तो वृद्धिंगत केला आहे.

व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांनी सांगितले, “या वर्षी बँकेने २५ हजार कोटींच्या एकूण व्यवसायाचा आकडा पार करून एक महत्त्वपूर्ण व्यवसायिक टप्पा गाठला आहे.  यातून आमच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि सशक्त वाटचालीचे दर्शन घडते. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या दोन राज्यात प्रवेश, नवीन शाखांतून विस्तार आणि सिटीझन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोवा आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या दोन बँकांचे विलिनीकरण यातून बँकेचा विकासाचा आणि विस्ताराचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो.