नवी मुंबई: सध्या सर्वत्र उन्हाच्या झळा वाढत चालल्याने नागरीक शीत पेयाकडे वळले आहेत. लिंबू सरबत शरीरासाठी अधिक लाभदायक ठरत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झालेली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे.
वाशीतील कृषी उत्पन्न बाजार आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये लिंबूची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे तीन आठवड्यांत मुंबई आणि नवी मुंबई परिसरात लिंबाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली असून, घाऊक व किरकोळ बाजारात दर जवळपास दुप्पट झाले आहेत. वाशी येथील एपीएमसी घाऊक बाजारात काही आठवड्यांपूर्वी २ ते ३ रुपये प्रति लिंबू असलेला दर आता वाढून पाच रुपये प्रति लिंबू झाला आहे. तर किरकोळ बाजारात २० रूपयांना चार लिंबे मिळत असताना आता ग्राहकांना त्याच किमतीत फक्त दोन लिंबे घ्यावी लागत आहेत. काही ठिकाणी एका लिंबाचा दर १० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
एपीएमसीमधील व्यापाऱ्यांच्या मते, या दरवाढीमागे अवकाळी पावसाचा फारसा संबंध नसून, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत हेच मुख्य कारण आहे. सध्या बाजारात लिंबाचा पुरवठा प्रामुख्याने आंध्र प्रदेशातून होत असून, महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांतून पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी बाजारात लिंबांची टंचाई निर्माण झाली आहे. लिंबू व्यापारी चंद्रकांत महामुळकर म्हणाले, “पुरवठा मर्यादित असल्याने मागणी पूर्ण होत नाही. त्यामुळेच दर वाढले आहेत. जोपर्यंत इतर राज्यांतून आवक सुरू होत नाही, तोपर्यंत दर कमी होण्याची शक्यता कमी आहे.”
लिंबाच्या वाढत्या किमतीचा परिणाम थेट खाद्य व्यवसायावरही झाला आहे. लहान उपाहारगृहांपासून रस्त्यावरील हातगाड्यांपर्यंत सर्वत्र दरवाढ दिसून येत आहे.“पूर्वी १० रुपयांना मिळणारे लिंबू सरबत आता २० रुपये प्रति ग्लास झाला आहे.