निवडणूक कर्तव्यात हलगर्जीपणा: चार शिक्षकांवर गुन्हे दाखल

उल्हासनगर: निवडणूक प्रक्रियेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी उल्हासनगर महानगरपालिकेने चार शिक्षकांविरोधात थेट पोलीस कारवाई केली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाही कर्तव्याकडे दुर्लक्ष केल्याने सहाय्यक आयुक्त विशाल कदम यांच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
१४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी शुद्धीकरणासाठी या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. दुबार नावे वगळणे, अस्पष्ट छायाचित्रांची पडताळणी करणे तसेच ‘एसआयआर मॅपिंग’ यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष आढाव्यात या शिक्षकांनी अपेक्षित कामगिरी न करता २० टक्क्यांपेक्षाही कमी काम पूर्ण केल्याचे उघड झाले.
कामातील दिरंगाईबाबत उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी संबंधितांना वारंवार कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. तरीही त्यांनी कोणताही प्रतिसाद न देता तसेच महत्त्वाच्या बैठकींकडे पाठ फिरवत वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन केले. शेवटी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेची शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही कारवाई इतर कर्मचाऱ्यांसाठी इशारा मानली जात आहे.