नाना-नानी पार्कऐवजी आरोग्य केंद्र?

ठाणे: उबाठा पक्षाकडून ठाणे महापालिकेवर एकमेव नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक शहाजी खुस्पे यांच्याकडून त्यांच्या प्रभागातील नाना-नानी पार्कच्या दुरुस्तीचा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात आला होता. मात्र दुरुस्तीऐवजी या ठिकाणी रातोरात चक्क नाना-नानी पार्कच्या जागेवर आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट प्रशासनाकडून घातला गेला आहे.
या आरोग्य केंद्राकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ताही नसताना हा आरोग्य केंद्राचा घाट तो सुद्धा एका रात्रीत कशासाठी असा प्रश्न आता प्रभागातील नागरिक विचारू लागले आहेत. दुसरीकडे यामध्ये सत्ताधाऱ्यांचीच खेळी असल्याचा आरोप उबाठाकडून करण्यात येत असल्याने उबाठा पक्षाचे एकमेव नगरसेवक असलेल्या शहाजी खुस्पे यांना नामोहरम करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून एकही संधी सोडली जात नसल्याची आता जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील संत ज्ञानेश्वर नगरमधील नाना-नानी पार्कची अतिशय दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी पूर्वी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक देखील येत होते. त्यामुळे या नाना-नानी पार्कची दुरुस्ती करून ते पुन्हा नागरिकांना वापरता यावे यासाठी उबाठा पक्षाचे नगरसेवक शहाजी खुस्पे यांनी प्रशासनाला यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र खुस्पे यांच्या पत्राची दखल न घेता या ठिकाणी प्रशासनानेही तातडीने तत्परता दाखवत या ठिकाणी नाना-नानी पार्कच्या जागेवर रातोरात आरोग्य केंद्राच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रभागात सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
यासंदर्भात महापौर कार्यालयातून शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने आरोग्य विभागाला हे आरोग्य केंद्र उभारण्याचे निर्देश दिले असल्याची पालिका वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनही आता सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप आता उबाठा पक्षाकडून केला जात आहे.