विकास प्रकल्पांमुळे जंगलाला फटका
शहापूर: शहापूर तालुक्यात विविध पायाभूत विकास प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याचे समोर आले असून आतापर्यंत सुमारे ९० हजारांहून अधिक झाडांची तोड झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
रेल्वे विस्तार, राष्ट्रीय महामार्ग, एक्सप्रेसवे, सिंचन प्रकल्प आणि गॅस पाइपलाइन यांसारख्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र वळवण्यात आल्यामुळे पर्यावरणीय परिणामांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या व्ही पॅकेजसाठी सर्वाधिक म्हणजे सुमारे ७९,५४० झाडांची तोड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३८५.६ हेक्टर वनक्षेत्र वळवण्यात आले आहे. तसेच मुंबई-वडोदरा एक्सप्रेस-वे (फेज २) प्रकल्पासाठी सुमारे १११.७ हेक्टर वनक्षेत्र वापरले जाणार असून त्यासाठी ६,५९७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन, एनएच-६१ (निर्मल रोड) विस्तार, एनएच-३ (नवीन एनएच-८४८) सुधारणा, तसेच भुवन आणि आसनाळी लघु सिंचन योजना यांसारख्या विविध प्रकल्पांमुळेही हजारो झाडांवर कुऱ्हाड चालली आहे. काही प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे तोडल्याची नोंद संबंधित विभागाकडे आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, पायाभूत विकास महत्त्वाचा असला तरी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. झाडे तोडल्यानंतर निकषांनुसार पर्यायी वृक्ष लागवड अपेक्षित प्रमाणात झालेली दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी करण्यात येणारा खर्चही यामुळे निष्फळ ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान भविष्यात अशा प्रकल्पांची अंमलबजावणी करतांना वृक्षतोड कमीत कमी होईल, वन्यजीव व नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होणार नाही, यासाठी नियोजनबद्ध धोरण राबवणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात, त्या प्रमाणात पर्यायी जागी प्रभावी वृक्षलागवड करून तिचे दीर्घकालीन संवर्धन करणे ही देखील काळाची गरज असल्याचे मत जाणकारांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
मोठ्या प्रमाणावर जंगल क्षेत्र नष्ट होणे ही चिंताजनक बाब असून नवीन लावलेल्या रोपांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे भविष्यात हवेचे प्रदूषण, वाढती उष्णता आणि पर्यावरणीय समतोलावर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चौकट
पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मुंबई महानगर प्रदेशातील नैसर्गिक ‘कार्बन सिंक’ कमी होण्याची शक्यता आहे. एका प्रौढ झाडाद्वारे दरवर्षी सुमारे २२ किलो कार्बन डायऑक्साइड शोषला जातो. त्यामुळे ९० हजारांहून अधिक झाडांच्या तोडीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्बन शोषण क्षमता घटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.