कल्याण : डोंबिवलीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून तोतया सीबीआय अधिकारी बनून ठगांनी एका कर्मचाऱ्याकडून ७१ लाख १० हजार रुपये उकळले. मात्र पीडिताच्या पत्नीच्या सतर्कतेमुळे आरोपींची ओळख पटली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी परिसरातील रहिवासी महेश आगरकर जे एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत, यांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिकारी असल्याचे सांगत त्यांच्या मोबाईलवरून आक्षेपार्ह संदेश पाठवण्यात आल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर संदीप कुमार राव आणि करण शर्मा नावाच्या व्यक्तींनी संपर्क साधून स्वतःला तपास यंत्रणेशी संबंधित असल्याचे भासवले. त्यांनी बँक खात्यांमध्ये अनियमितता असल्याचे सांगत पीडिताला घाबरवले. आरोपींनी सुप्रीम कोर्टाचे बनावट कागदपत्रे पाठवून प्रकरण गंभीर असल्याचे भासवले आणि कारवाई टाळण्यासाठी पैसे भरण्याची मागणी केली. भीतीमुळे आगरकर यांनी वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ७१ लाख १० हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले.
प्रकरणाला वळण तेव्हा लागले, जेव्हा पीडिताला संशय आला आणि त्यांनी संपूर्ण माहिती पत्नीला दिली. पत्नीने आरोपींना प्रश्न विचारले असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे समोर आले. लगेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले की, आरोपींचा डिजिटल मागोवा घेण्यात आला असून त्यांना अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी सांगितले की, बँक व्यवहारांची सखोल चौकशी केली जात आहे.ननागरिकांनी सतर्क राहावे. कोणत्याही अनोळखी कॉलवर, सरकारी संस्थेच्या नावाखाली पैसे मागितल्यास किंवा धमकीचे संदेश आल्यास त्वरित विश्वास ठेवू नये. अशा वेळी अधिकृत पडताळणी करून जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.