तीन कोटींचे सोन्याचे दागिने हस्तगत
ठाणे: सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या सराफांना चांगल्या दर्जाचे सोने परदेशातून येणार असल्याचे सांगून ठाणे आणि भिवंडीमधील सराफांची करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तीन कोटी रुपये किमतीचे सोने आणि लाखोंची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
जिवराम चौधरी (४६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २०२५च्या दिवाळी सणाच्या दरम्यान चांगल्या प्रतीचे सोने येणार असून त्याच्या माध्यमातून जास्त नफा मिळणार असल्याचे आमिष या भामट्याने ठाणे आणि भिवंडीमधील सराफांना दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस करत होते.
आरोपी वेळोवेळी लोकेशन बदलत असल्याने तसेच अनेक राज्यात फरार होत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता. अखेर तो मार्च महिन्याच्या २३ तारखेला घोडबंदर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून तीन कोटी रुपये किमतीचे दोन किलो सोने आणि १७ लाख ५० हजारांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे पोलिस करत आहेत.