अभय योजनेशिवाय मालमत्ता कर वसुलीत २८ कोटींची वाढ

मीरा-भाईंदर महापालिकेची २५८ कोटींचा मालमत्ता कर वसुल

भाईंदर : ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत २५८ कोटी ४८ लाख इतकी उल्लेखनीय कर वसुली करण्यात आली.

मालमत्ता कर हे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख साधन असून, चालू आर्थिक वर्षात थकीत कर वसुलीस प्राधान्य देत विविध प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या. दीर्घकालीन थकबाकीदारांवर मालमत्ता जप्ती, जाहीर लिलावाची कार्यवाही, तसेच व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या सर्व उपाययोजनांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला असून मोठ्या प्रमाणावर कर भरणा झाला आहे.

आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त (कर), उपायुक्त (कर), सहाय्यक आयुक्त (कर) व सर्व प्रभागातील अधिकारी, कर निरीक्षक व कर्मचारी यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. मागील वर्षी ३१ मार्च २०२५ रोजी २३०.९७ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली ही उत्कृष्टरित्या व वेगाने झाली आहे. विशेष करुन या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने अभय योजना लागू केली नसतानाही मालमत्ता कर वसुलीत २८ कोटी इतकी अधिक वाढ करण्यात आली आहे.

आयुक्त शर्मा यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (माहिती तंत्रज्ञान) यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या WWW.MBMC.GOV.IN वेबसाईट व MYMBMC मोबाईल अॅपचा वापर करून मालमत्ता कर भरणा करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत एक लाख ६७ हजार नागरिकांनी १३५ कोटी ७४ लाख रक्कम तर रोख रक्कम आणि धनादेशाद्वारे एक लाख ४६ हजार नागरिकांनी १२३ कोटी १० लाख कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य केले आहे. शहरातील सर्व नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करून केलेल्या सहकार्याबद्दल महानगरपालिकेच्या आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.