उकाड्यात ३७ लाख प्रवाशांनी केला गारेगार प्रवास!
मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून, मुंबईकर प्रवाशांनी आता आरामदायी प्रवासासाठी वातानुकूलित लोकलला मोठ्या प्रमाणावर पसंती दिल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल सेवेतून मार्च महिन्यात तब्बल ३७ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत यात लक्षणीय वाढ झाली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी वातानुकूलित लोकलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कार्यालयीन वेळेत प्रवास करणारे नोकरदार, व्यावसायिक; तसेच विद्यार्थ्यांचा वातानुकूलित लोकलकडे कल वाढल्याचे निदर्शनास आले आहे. उष्णतेपासून संरक्षण, स्वच्छता आणि आरामदायी प्रवास या सुविधांमुळे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळत आहेत. दरम्यान, वातानुकूलित लोकलचे भाडे सामान्य लोकलच्या तुलनेत अधिक असले, तरी प्रवाशांना मिळणारा आराम, वेळेची बचत आणि प्रवासातील सुरक्षितता यामुळे अनेक जण अतिरिक्त खर्च करूनही वातानुकूलित लोकलचा पर्याय निवडत आहेत. विशेषतः दीर्घ अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरत आहे.
मध्य रेल्वेवर डिसेंबर २०२५ मध्ये ५ लाख ७७ हजार तिकीट विक्री झाली. यानुसार ३० लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला १२.९० कोटी रुपये महसूल मिळाला. जानेवारी २०२६ रोजी ५ लाख ९३ हजार तिकिटांची विक्री झाली. याद्वारे ३३.२६ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला १३.६७ कोटी रुपये महसूल मिळाला.
फेब्रुवारी २०२६ रोजी ६ लाख ६० हजार तिकीट विक्री झाली. याद्वारे ३३ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला १४ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला.
मार्च २०२६ रोजी सहा लाख ८७ हजार तिकीट विक्री झाली. याद्वारे ३७ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून मध्य रेल्वेला १५.४८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला.
मध्य रेल्वेवरील सामान्य लोकलमध्ये वाढती गर्दी मोठी समस्या बनली आहे. वातानुकूलित लोकलमुळे त्या गर्दीचा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन या सेवेचा विस्तार करण्याचा विचार करीत आहे. येत्या काळात वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्यावर रेल्वे अधिकाऱ्यांचा भर असल्याचे संकेत आहेत.
वातानुकूलित लोकलमधील सुरक्षितता आणि तुलनेने कमी गर्दी यामुळे महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांसाठी ही सेवा अधिक सोयीची ठरत आहे. याशिवाय, स्वच्छता आणि नियंत्रित वातावरणामुळे आरोग्यदृष्ट्याही ही सेवा फायदेशीर मानली जात आहे.
प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून वातानुकूलित लोकलच्या सेवेत अधिक सुधारणा करण्याचे नियोजन सुरू आहे. नवीन मार्गावर वातानुकूलित लोकल सुरू करणे, सध्याच्या फेऱ्यांची वेळ सुधारणे आणि प्रवाशांच्या गरजेनुसार सुविधा वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. एकूणच, वाढत्या उन्हाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर वातानुकूलित लोकल ही मुंबईकरांसाठी केवळ पर्याय न राहता, दैनंदिन प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग बनत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या काळात वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.