शहर विकास विभागाने दिला ठामपाच्या संकल्पाला ‘अर्थ’

६५२ कोटींहून अधिक महसूल जमा

ठाणे: सहा हजार कोटींवर झेप घेतलेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाला शहर विकास विभागाने खऱ्या अर्थाने अर्थ दिला असून दोन कोटींची अधिकची भर घालत ६५२ कोटींचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

शहर विकास विभागाने २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात उत्पन्नात तब्बल ६५२ कोटी ५८ लाखांची भर टाकली आहे. विशेष म्हणजे दिलेल्या ६५० कोटींच्या लक्ष्याच्या तुलनेत दोन कोटींची जास्त ‘कमाई’ या विभागाने केली आहे. गेल्यावेळेच्या तुलनेतही ७० कोटींपेक्षा जास्तीचा हा महसूल आहे.

पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत शहर विकास विभाग असल्याचे गेल्या तीन वर्षांपासून सिद्ध होत आहे. शहरात सुरू असलेले नवनवीन गृहप्रकल्प, अतिरिक्त एफएसआय प्रीमियम, मालमत्ता कर, बांधकाम कामगार कल्याणकर, अनामत रक्कम आणि शासनाचा हिस्सा या माध्यमातून यंदाही शहर विकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे.

महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेले उद्दिष्ट ६५० कोटी ६० लाख इतके होते. त्यानुसार वसुलीचे उद्दिष्ट ठेवत शहर विकास विभागाने ६५२.५८ कोटीपर्यंत मजल मारली आहे. २०२२ मध्ये शासनाने बांधकाम उद्योगाला ५० टक्के प्रिमिअर सूट दिल्यामुळे त्यावर्षी एक हजारहून अधिक महसूल जमा झाला होता. त्यामुळे सन २०२४-२५ मध्ये या विभागाला ५८२ कोटी १५ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. हे लक्ष्य गाठताना विभागाची दमछाक झाली होती. मात्र तरीही लक्ष्य पूर्ण करून ५८२ कोटी ७२ लाख रुपये महसूल जमा करण्यात यश आले होते.

बांधकाम क्षेत्रातील वाढ, एफएसआयचा वाढता वापर आणि कर वसुलीतील काटेकोरपणा यामुळे महसूल वाढीस चालना मिळाल्याचे दिसून येत आहे. या निधीमुळे शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरी सेवा सुधारण्यास गती मिळणार असल्याचा विश्वास शहर विकास विभागाने व्यक्त केला आहे.

 

महसूल वसुलीचा तपशील

* अतिरिक्त एफएसआय प्रीमियम: १०९ कोटी ११ लाख ८२६३३
* मालमत्ता कर: २७ कोटी ८५ लाख
* बांधकाम कामगार कल्याण कर: ९६ कोटी ५७ लाख ९५,२३६
* अनामत रक्कम: ८८ लाख ३७,०९५
* शासन हिस्सा: १८० कोटी २१ लाख १८,७०६
* निव्वळ वसुली: ६५२ कोटी ५७ लाख ९४,०७३