ब्रेन डेड तरूणाच्या अवयवदानातून सहा जणांना मिळाले नवजीवन

ठाणे: ठाण्यात श्री महावीर जैन रुग्णालयात दाखल ३३ वर्षीय युवकाला ब्रेन डेड घोषित केल्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा आदर्श निर्णय घेतला. त्यांच्या या धाडसी आणि उदात्त कृतीमुळे आणि रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे सहा जणांना नवजीवन मिळाले आहे.

सोमवार २३ मार्च २०२६ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी युवकावर सुरुवातीला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मेंदूला जबर मार बसल्याने त्याच्यावर डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील उपचारांसाठी २७ मार्च रोजी त्यांना ठाण्यातील श्री महावीर जैन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस नसल्याचे आढळून आले. आवश्यक चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले.

या अत्यंत वेदनादायी प्रसंगी डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबियांचे समुपदेशन करत अवयवदानाची संकल्पना समजावून सांगितली. स्वतःच्या दुःखावर मात करत कुटुंबियांनी मोठ्या मनाने अवयवदानास संमती दिली. हा निर्णय केवळ एका कुटुंबाचा नसून, संपूर्ण समाजासाठी आशेचा किरण ठरला आहे.

२९ मार्च रोजी झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली अवयव काढण्याची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या प्रक्रियेत हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड, स्वादुपिंड, कॉर्निया तसेच हाडांचे दान करण्यात आले. विशेष म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि आव्हानात्मक ‘स्प्लिट लिव्हर’ प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली. एका यकृतातून दोन रुग्णांना केईएम रुग्णालयातील नऊ वर्षांच्या बालकाला आणि नानावटी रुग्णालयातील प्रौढ रुग्णाला नवे जीवन मिळाले. दान करण्यात आलेले अवयव मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना वितरित करण्यात आले.

अपोलो रुग्णालयात यकृताचा उजवा भाग, नानावटी रुग्णालयात मूत्रपिंड व स्वादुपिंड, एच.एन. रुग्णालयात हृदय, तर केईएम रुग्णालयात यकृताचा डावा भाग व मूत्रपिंड देण्यात आले. याशिवाय, हाडे नोवो टिश्यू बँक व रिसर्च सेंटरला, तर कॉर्निया सहियारा आय बँकेला सुपूर्द करण्यात आले.

या घटनेत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अवयवदाता आणि त्यांच्या कुटुंबियांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि मोठेपणा. स्वतःच्या दुःखाच्या क्षणीही इतरांचे आयुष्य वाचवण्याचा घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थाने ‘जीवनदान’ देणारा ठरला आहे.

महावीर जैन ट्रस्टचे विश्वस्त अजय आशर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी समाजातील नागरिकांना आवाहन केले की, “अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती मानवतेची सेवा आहे. प्रत्येकाने याबाबत जागरूक होऊन पुढाकार घ्यावा.” ही घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की, मृत्यूनंतरही आपण इतरांच्या रूपाने जिवंत राहू शकतो फक्त एक निर्णय घ्यायची गरज आहे.