पूरमुक्त वसई-विरारसाठी पालिकेचा आराखडा तयार

* २६३ ठिकाणी विस्तारणार गटारांचे जाळे
* २२२.८३ कोटींच्या निधीचे नियोजन
वसई : वसई-विरार शहराच्या भौगोलिक रचनेचा विचार करून तयार करण्यात आलेल्या नव्या आराखड्यानुसार, पालिकेने तब्बल २६३ ठिकाणी नवीन आरसीसी गटार व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २२२.८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यामुळे सखल भागांतील पाणी निचरा होण्याची प्रक्रिया वेगवान होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढेही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती. यासाठी १२ कोटींचा निधी खर्च केला होता. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने होण्यासाठी व पावसाचे पडणारे पाणी शहरात साठून राहू नये व पाणी जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.
मागील काही वर्षात अनिर्बंध विकास कामे झाली आहेत. त्यामुळे पाणी जाण्याचे पूर्वीचे मार्ग आता बंद झाले आहेत. शहरातील दैनंदिन निघणारे सांडपाणी व पावसाचे पाणी निचरा होण्यास मार्गच नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने वसई, विरार, नायगाव, नालासोपारा अशा विविध भागाचे सर्वेक्षण करून सुमारे २६३ ठिकाणी आरसीसी गटारे बांधली जाणार आहेत. यासाठी महापालिकेने २२२.८३ कोटी रुपयांचे नियोजन केले आहे. त्याचा प्रस्ताव सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे.
चौकट
शहरातील एकूण २६३ संवेदनशील आणि आवश्यक ठिकाणी नवीन आरसीसी गटारांचे बांधकाम केले जाणार आहे. जुन्या आणि अरुंद असलेल्या नाल्यांची क्षमता वाढवून त्यांना मुख्य खाडी किंवा मोठ्या नाल्यांशी जोडून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा केला जाईल. पाणी साचणाऱ्या ‘हॉटस्पॉट्स’वर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणचा पाण्याचा प्रवाह वळवण्यात येणार आहे.