१५ हजार थकबाकीदारांकडून
८१ कोटींची मालमत्ता करवसुली
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत १५ हजारांहून अधिक थकबाकीदारांनी ८१ कोटींपेक्षा जास्त रक्कम भरली आहे. या योजनेची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंत असून लाभ घेण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने नागरिकांना तातडीचे आवाहन केले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पाचपर्यंत चालू आर्थिक वर्षात एकूण ७५५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. आतापर्यंत दोन लाख १४,९०० मालमत्ताधारकांनी कर भरला असून त्यापैकी ६१.५ टक्के नागरिकांनी ऑनलाइन, तर ३८.५ टक्के नागरिकांनी ऑफलाइन पद्धतीने भरणा केला आहे.
अभय योजनेअंतर्गत निवासी, अनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांवरील थकीत कर एकरकमी भरल्यास विलंब शुल्कावर ५० टक्के सवलत दिली जात आहे. या सवलतीचा लाभ घेत १५,०९२ थकबाकीदारांनी ८१ कोटी ३४ लाख ४९,६८९ रुपये जमा केले आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्यास अवघे काही दिवस उरल्याने कर वसुली मोहीम अधिक गतीमान करण्यात आली आहे.
कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी शनिवार (२८ मार्च) व रविवार (२९ मार्च) या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी तसेच सोमवार (३० मार्च) रोजी कर संकलन केंद्रे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. अंतिम दिवशी, ३१ मार्च रोजी ही केंद्रे रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे नोकरदार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यंदा महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ऑनलाइन पेमेंट प्रणाली, विविध डिजिटल माध्यमे, तसेच एसएमएस, नोटीस व प्रत्यक्ष भेटीद्वारे पाठपुरावा करण्यात आल्याने वसुली प्रक्रियेला गती मिळाली आहे.
मालमत्ता कर भरण्यासाठी महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप चॅटबॉट तसेच कर संकलन केंद्रांद्वारे ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अद्याप कर न भरलेल्या मालमत्ताधारकांनी या सुविधांचा लाभ घेऊन त्वरित कर भरणे आवश्यक असल्याचे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी अखेरचे चार दिवस शिल्लक राहिले असून ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत आहे. थकीत मालमत्ता कर एकरकमी भरल्यास विलंब दंडावर ५० टक्के सवलत दिली जात आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता उर्वरित मालमत्ताधारकांनीही ही संधी न दवडता त्वरित कर भरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.