रोव्हर तंत्रज्ञानाने होणार अचूक मोजणी
शहापूर: शेतकऱ्यांच्या जमिनींचे अचूक विभाजन होऊन त्यांना हक्काचे आणि अद्ययावत दस्तऐवज मिळावेत, यासाठी राज्य शासनाच्या ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पाची सुरुवात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात होणार आहे. अत्याधुनिक ‘रोव्हर’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही मोजणी करण्यात येणार असून त्यामुळे जमिनींचे अचूक मापन जलदगतीने पूर्ण होणार आहे.
शहापूर तालुक्यातील तब्बल २२५ गावांमध्ये ‘पोटहिस्सा मोजणी’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात डोळखांब परिसरातील पोफोडी, आपटे, आदिवली, मानखिंड आणि ठुणे (बु.) या गावांपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक शरद काळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मोजणीची प्रक्रिया वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच तालुक्यातील ज्या ७/१२ उताऱ्यांवर अद्याप मोजणी झालेली नाही किंवा जमिनींचे हिस्से स्पष्ट झालेले नाहीत, अशा सर्व जमिनींची नव्याने मोजणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ १० गुंठे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार असून त्यांच्या जमिनींचे अचूक पोट हिस्से निश्चित केले जाणार आहेत.या उपक्रमामुळे प्रत्येक जमीनधारकाला अद्ययावत ७/१२ उतारा आणि हिस्सानिहाय नकाशा उपलब्ध होणार आहे. परिणामी जमीन खरेदी-विक्री व्यवहार अधिक सुलभ होणार असून शासकीय योजनांचा लाभ घेणे, पीक विमा मिळविणे तसेच नैसर्गिक आपत्तीतील भरपाई प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. एकूणच, ‘पोटहिस्सा मोजणी’ प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जमिनीच्या हक्कांच्या प्रश्नांना मार्ग मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.