नवी दिल्ली: पश्चिम आशियातील युद्ध चौथ्या आठवड्यात पोहोचले आहे आणि अमेरिका व इराण यांच्यात नव्या हल्ल्यांच्या धमक्यांनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि गेल्या वर्षभरातील वाढ पुसून निघण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, जागतिक स्तरावर सोन्या-चांदीच्या दरातील नरमाई, तसेच अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे महागाई आणि जागतिक व्याजदरांमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाल्यामुळे सोमवारी भारतात सोन्या-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली. एमसीएक्सवरील सोन्याचे दर मागील बंद पातळी 1,44,492 च्या तुलनेत तीन टक्के घसरून एक लाख 40,158 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडले. तर काही मिनिटांत आणखी 7,115 रुपये किंवा 4.92 टक्के इतकी घसरण होऊन दरांनी एक लाख 37,377 रुपयांची नीचांकी गाठली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती 10 टक्केहून अधिक कोसळल्या. तसेच एमसीएक्सवर चांदीच्या दरात सहा टक्के किंवा 13,606 रुपयांची घट होऊन दर प्रति किलो दोन लाख 13,166 रुपयांवर पोहोचले. देशांतर्गत बाजारात मार्च महिन्यात आतापर्यंत सोने आणि चांदीच्या किमती 12 टक्के ते 17 टक्के घसरल्या आहेत.