ठाण्यातील नालेसफाई आता रोबोटच्या मदतीने होणार

ठाणे: ठाणे महापालिकेने यंदा रोबोटच्या मदतीने नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी मुंबई आयआटीने तयार केलेले रोबोटची यंत्रणा दहा ठिकाणी प्रायोगिक तत्वावर उभारली जाणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे ३०० किमी लांबीचे नाले आहेत. शहराच्या विविध भागातून हे नाले जातात आणि ते खाडीला येऊन मिळतात. शहरातील नाल्यांमध्ये कचरा फेकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहेत. यामुळे शहरातील नाले कचऱ्याने भरलेले दिसून येतात. या कचऱ्यामुळे पावसाचे पाणी तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेकडून नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यात येते. वर्षभरात एकदाच नालेसफाई करण्यात येते. यानंतर नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष होते. मध्यंतरी वर्षातून दोनदा नालेसफाई सुरू करण्यात आली होती. मात्र, दोनच वर्षात ही पद्धत बंद करण्यात आली.

शहरातील नाल्यातील कचरा साफ करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात येतो. यानंतरही सफाई योग्य प्रकारे होत नाही. त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये साचणारा प्लास्टिक आणि तरंगता कचरा (फ्लोटिंग मटेरियल) काढण्यासाठी विशेष यंत्रणा म्हणजेच रोबोटची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शहरातील तसेच खाडी मुखालगत अशा एकूण १० ठिकाणी मुंबई आयआयटीने विकसित केलेली पेटंट प्राप्त प्रणाली बसविण्यात येणार असून या ही प्रणाली नाल्यातून वाहून येणारा प्लास्टिक कचरा अडवून तो वेगळा करण्याचे काम करणार आहे.

ठाण्यातही डबलडेकर बस

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्त्यांवर आता डबलडेकर बसगाड्या धावणार असून येत्या सहा महिन्यात या बसगाड्या टिएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. याबाबतची घोषणा सोमवारी सादर झालेल्या ठाणे परिवहन उपक्रमाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा २०२६-२७ या आर्थिककरीता ७९१ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प सोमवारी व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेपुढे सादर केला. पुणे येथील सेंट्रल इन्स्टीट्युट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार, १ लाख लोकसंख्येस ५० बसगाड्या असणे आवश्यक आहे. ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाख इतकी असून शहरास १३५० बसगाड्यांची आवश्यकता आहे. शहरात सरासरी तीन लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. परंतु शहरात ४६७ बसगाड्या उपलब्ध आहेत. सीआयआरटी संस्थेच्या तत्वानुसार ही संख्या अपुरी असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाड्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पीएम ई बस योजनेतून १०० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, १५ व्या वित्त आयोगातून १६० वातानुकूलीत विद्युत बसगाड्या, शंभर सीएनजी अशा एकूण ३७० बसगाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे. यात १० डबलडेकर बसगाड्यांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत १० डबलडेकर बसगाड्या खरेदी करण्याचा प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून यामुळे या बसगाड्या खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बसखरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली असून येत्या सहा महिन्यात या बसगाड्या दाखल होऊ शकतील, असा अंदाज परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी व्यक्त केला आहे.