* ठाण्यात दोन मोठे ट्रक टर्मिनस प्रस्तावित
* ५७ ठिकाणी पार्किंग आरक्षण
मुंबई: ठाण्यात सध्या सुमारे ११,९३१ पार्किंग लॉट्सचे नियोजन करण्यात आले आहे. दोन मोठे ट्रक टर्मिनस प्रस्तावित असून ५७ ठिकाणी पार्किंग आरक्षणाला राज्य शासन लवकरच मंजुरी देणार असल्याचे सांगत एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र पार्किंग पॉलिसी तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी लक्षवेधीद्वारे ठाणे आणि लगतच्या शहरांमधील वाढत्या वाहतूक व पार्किंग समस्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. कोविडनंतर खाजगी वाहने, तसेच ओला-उबरसारख्या व्यावसायिक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पार्किंगची गंभीर समस्या निर्माण झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
चर्चेदरम्यान आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी सांगितले की, २०२५ मध्ये ३१,३९० वाहनांवर तर २०२६ मध्ये आतापर्यंत ४,२६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असली तरी ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून मूळ समस्या पार्किंगच्या अपुऱ्या सुविधांमुळे निर्माण होत आहे. अनेकांनी कर्जावर वाहने घेतली आहेत, परंतु त्यांच्या पार्किंगची व्यवस्था नसल्याने ही वाहने निवासी संकुलांच्या बाहेर उभी राहतात आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नसून मुंबई, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रातील गंभीर सामाजिक समस्या बनली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नगरविकास विभागामार्फत संपूर्ण एमएमआर क्षेत्रासाठी सर्वसमावेशक पार्किंग धोरण तयार करण्याची मागणी केली. तसेच हे धोरण तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना आणि आक्षेपांचा विचार करावा, तसेच नवीन ट्रक टर्मिनस आणि पार्किंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभाराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात सध्या सुमारे ११,९३१ पार्किंग लॉट्सचे नियोजन करण्यात आले असून गावदेवी भूमिगत पार्किंग, विविआना मॉल, कशिश पार्क, नाईकवाडी आदी ठिकाणी सुमारे २,१५२ वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच लवकरच २,०८५ वाहनांसाठी अतिरिक्त पार्किंग सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय ठाणे विकास आराखड्यात ७.७१ हेक्टर क्षेत्रावर दोन मोठे ट्रक टर्मिनस प्रस्तावित असल्याची माहिती देत ५७ ठिकाणी पार्किंग आरक्षण मंजुरीसाठी शासनाकडे आलेल्या प्रस्तावावरही लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण एमएमआर क्षेत्रासाठी स्वतंत्र पार्किंग पॉलिसी तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नगरविकास खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्यासह एमएमआर क्षेत्रातील विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांचा समावेश असेल आणि ९० दिवसांच्या आत अहवाल सादर केला जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सभागृहात सांगितले.
एमएमआर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक आणि पार्किंग समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.