येऊरच्या जंगलात उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई होणार

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रात बेकायदा बांधकांमांसोबतच, आता उत्खनन देखील होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात उत्खननासाठी तहसीलदारानेच परवानगी दिल्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे उत्खननास दिलेला परवाना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता येऊरच्या जंंगलातील उत्खनानाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला असून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरच्या जंगलात मोठ्याप्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे येथील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटे मोठ्याप्रमाणात आढळतात. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असतानाही या भागात अतिक्रमणे झाल्याने नाराजी व्यक्त केली जाते. काही दिवसांपूर्वीच येथे उत्खननाला परवानगी दिल्याचे प्रकरण उघड झाले होते. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात प्रश्न उपस्थित केला. आव्हाड म्हणाले की, वनमंत्री गणेश नाईक यांच्या मतदारसंघाच्या बाजूला असलेल्या मतदारसंघातील येऊरमध्ये राजरोसपणाने उत्खनन केले जात आहे. त्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये तहसीलदाराने परवानगी दिल्याने त्यांना दोषी धरण्यात आले. परंतु या प्रकरणात काही कारवाई करणार का असे आव्हाड म्हणाले.

त्यावर गणेश नाईक यांनी उत्तर दिले. येऊर लगत अनेकांच्या खासगी जमीनी आहेत, आदिवासींच्या जमीनी आहेत. आव्हाड यांनी कोणत्या परिसरात, सर्वे क्रमांकावर उत्खनन होत आहे, याची माहिती दिली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे म्हणाले.