वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ठाणेवैभव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘व्हिजनरी वूमन्स अवॉर्ड्स’ हा विशेष सन्मान सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून द ठाणे क्लबच्या संचालिका निकेता शर्मा, प्रशांत कॉर्नरच्या ऐश्वर्या सकपाळ, मोनोक्रोम पॅटिसरीच्या शेफ तन्वी किरावंत आणि बोरकर रिॲलिटीच्या नंदिनी बोरकर-सारंगधर यांनी उपस्थित राहून महिलांच्या कार्याचा गौरव केला. तसेच वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या हेड रिसर्चर आणि अकॅडमिक्स डॉ. गार्गी वाविकर-चतुर्वेदी यांचीही विशेष उपस्थिती लाभली. यावेळी संध्या अय्यर-भिडे यांनी प्रमुख अतिथींशी संवाद साधला. सूत्रसंचालन ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले. कार्यक्रमात ठाण्यातील इनरव्हील क्लब्सच्या कार्यकर्त्या महिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला. समाजकार्य, नेतृत्व आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एन्ड, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे ईस्ट, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे एसेस यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून डॉ. चंद्रशेखर वावीकर आणि डॉ. वैशाली वावीकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या प्रगतीत शिक्षण, आत्मविश्वास आणि समाजाच्या पाठबळाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांनी विविध क्षेत्रांत नेतृत्व करत समाजाच्या विकासात मोलाची भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
“वडिलांकडून निरीक्षणातून खूप काही शिकले. त्यांच्या तत्त्वांना जपून आर्किटेक्ट म्हणून काम करताना नेतृत्वाची जाणीव झाली. ग्राहक आमच्यासाठी केवळ ग्राहक नसून सहनिर्माते आहेत. शाश्वत जगणं हा ट्रेंड नाही, ते नेहमीच परवडणारं आणि आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांचं स्वप्नातील घर मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच माझ्यासाठी सर्वात अमूल्य क्षण असतो.”, असे नंदिनी बोरकर यांनी सांगितले.
“ट्रॉमा हा आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतो. वडिलांच्या निधनानंतर आमच्या उद्योगावर मोठं संकट आलं, पण त्या अडचणींनीच मला नेतृत्वाची ताकद दिली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिस्त, अनपेक्षित संकटांना सामोरे जाण्याची तयारी आणि प्रत्येक दिवस हसत पुढे नेण्याची वृत्ती महत्त्वाची असते. टीमसोबत सतत संवाद ठेवा, त्यांना आत्मविश्वास द्या ‘चुकलं तर सांभाळून घेऊ’ हा विश्वास त्यांच्यात असावा. अपयशाचा गौरव करू नका; पण चूक समजून घेऊन त्यातून शिकणं आवश्यक आहे.”, असे तन्वी किरावंत यांनी आपले मत व्यक्त केले.
“वडिलांनी सुरू केलेल्या उद्योगात छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळताना हळूहळू मोठे निर्णय घेण्याची संधी मिळाली आणि तेव्हाच नेतृत्वाची जाणीव झाली. प्रशांत कॉर्नरचा वारसा जपत ब्रँडची तत्त्वं आणि संस्कृती कायम ठेवत, नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत बदल करत पुढे जाणं महत्त्वाचं वाटलं. ग्राहकांना प्रीमियम दर्जा, कन्सिस्टन्सी आणि उत्कृष्ट पॅकेजिंग देणं हीच प्रशांत कॉर्नरची ओळख आहे. वाढ आणि बदल दोन्ही धाडसी निर्णय असतात आणि त्या प्रवासात टीमसोबतची पारदर्शकता ही सर्वात अमूल्य गोष्ट असते.”, असे ऐश्वर्या सकपाळ यांनी सांगितले.
“मी निर्णय मनापासून घेते. ते कधी कधी भावनिक असतात, पण जर त्या निर्णयांमुळे माझे कामगार, सहकारी आणि फाउंडेशन यांना फायदा होत असेल तर ते योग्यच ठरतात. आमच्यासाठी पेशंट केंद्रस्थानी असतो. त्यांच्याशी आत्मविश्वासाने संवाद साधणे, त्यांना विश्वास देणे आणि करुणाभावाने सेवा करणे हेच महत्त्वाचे आहे. टीमची मतं ऐकणं, त्यांची क्रिएटिव्हिटी जपणं आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्याचा सखोल अभ्यास व प्रशिक्षण घेणं, हीच आमची कार्यसंस्कृती आहे.” असे गार्गी वावीकर यांनी मत व्यक्त केले.
“खरी लीडरशिप म्हणजे कितीही भीती असली तरी ती चेहऱ्यावर न दाखवता, उलट आपल्या टीमला अधिक प्रोत्साहन देणे. आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक आणि पाहुणा ‘अतिथी देवो भव’ या भावनेने महत्त्वाचा आहे. हसून संवाद साधणे, त्यांची गरज समजून घेऊन सेवा देणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच आमच्या कार्यपद्धतीचे मूल आहे. स्टाफला योग्य प्रशिक्षण देऊन प्रत्येकाला समान वागणूक मिळेल याची काळजी घेणे हीच माझ्या टीमची खरी ताकद आहे.”, असे निकेता शर्मा यांनी सांगितले.
“आपण सगळे वेगळे असलो तरी इथे कोणताही भेदभाव नाही. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाबद्दल, वडिलांबद्दल बोलताना अनुभव शेअर केले ही प्रक्रिया म्हणजे शेअरिंग आणि कोलॅबोरेशन आहे. यामागचा उद्देश ‘राइट्स, प्राईड आणि ॲक्शन’ हा आहे. राइट्स म्हणजे आपल्या जबाबदाऱ्या ओळखणे आणि ॲक्शन म्हणजे त्या जबाबदाऱ्यांतून काहीतरी करून दाखवणे.”, असे मत वैशाली वावीकर यांनी मांडले.
ठाण्यातील माजीवाडा येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात उपस्थित महिलांनीही आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करत एकमेकांना प्रेरणा देणारे वातावरण निर्माण केले. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठाण्यात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी ठाणेवैभव हे मीडिया पार्टनर होते.