राज्याच्या अर्थसंकल्पात ठाणे-पालघर चमकले
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सादर केलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात ठाणे आणि पालघर जिल्हा प्रकर्षाने चमकला. ठाणे शहरातील गायमुख जंक्शन ते फाऊंटन हॉटेल जंक्शन आणि पुढे भाईंदर असा अनुक्रमे सहा आणि नऊ किमीचा भुयारी मार्ग आणि त्यावर उन्नत मार्ग उभारण्यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली. या बरोबरच अटल सेतूजवळील तिसरी आणि वाढवण बंदराजवळ चौथी मुंबई आदी प्रकल्पांना अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात मुंबई महानगर क्षेत्र हे दळणवळणाचे मोठे केंद्र बनणार असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनीच राज्याचा सात लाख ६९,४६७ कोटी रुपयांची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला. यात महसुली जमा अंदाजे सहा लाख १६,०९९ कोटी आणि महसुली खर्च अंदाजे सहा लाख ५६,६५१ कोटी असून ४०,५५२ कोटी रुपये अंदाजित तूट दाखवण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात ठाणे-पालघरमधील प्रकल्पांना चालना देण्यासाठी मोठी तरतूद करताना राज्यातील शेती, उद्योग आदी क्षेत्रालाही मोठा निधी देण्यात आला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने अजित पवार यांना श्रद्धांजली असल्याचे महत्त्वाचे विधान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केले.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची ठाणे ते तलासरी मार्गावरील तीन स्थानके फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. विरार, बोईसर आणि ठाणे स्थानकाभोवती विकासाचा बृहद् आराखडा तयार करण्यात येणार आहे. अटल सेतूला जोडून २०० चौरस किमी क्षेत्रात तिसरी मुंबई तयार करण्यात येणार असून कर्नाळा, साई, चिरनेर नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ अधिसूचित क्षेत्र ही ग्रीनफिल्ड शहरे तयार करण्यात येणार आहेत. वाढवण बंदर येथे चौथी मुंबई तयार करण्यात येणार असून लॉजिस्टिक आणि वेअर हाउसिंगसाठी विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरामुळे १२ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. मासेमारांसाठी सातपाटी येथे अत्याधुनिक मत्सबंदर तयार करण्यात येऊन आसपासच्या ४४ गावांत कौशल्य विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८ साठी २२,८६२ कोटी तर तळोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रोसाठी ५५७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ठाणे ते बोरिवली, खारघर ते तुर्भे भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ठाण्यातील गायमुख जंक्शन ते फाऊंटन हॉटेल जंक्शन ते पुढे भाईंदर असा अनुक्रमे सहा आणि नऊ किमीचा भुयारी मार्ग प्रस्तावित आहे. ऐरोली कटाई नाका ठाणे ते नवी मुंबई विमानतळ, छेडा नगर ते आनंदनगर आणि आनंदनगर ते साकेत असे उन्नत मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
मुंबई ते वाढवण बंदर जोडण्यासाठी उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी ५८,७५४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बाळकुम ते गायमुख हा किनारी मार्गही प्रस्तावित आहे. अर्थसंकल्पात कल्याण ते लातूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गही प्रस्तावित करण्यात आला आहे. तर पनवेल-कर्जत उपनगरीय प्रकल्प ३ बी अंतर्गत १४,९०७ कोटींच्या माध्यमातून बदलापूर कर्जत, आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई आणि ६९ किमीचा नवीन उपनगरीय कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.
नवीन वाहने खरेदी करताना बीएस-४ व त्यावरील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना मोटार वाहन करात १६ टक्के बीएस-३ आणि त्याखालील प्रदूषण मानके असलेल्या वाहनांना ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. तर बीएस-४ व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खाजगी संवर्गातील वाहनांमुळे वायू प्रदूषण होत असल्याने अशा वाहनांवर पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनावर दोन हजार रुपयांवरून चार हजार रुपये, हलकी मोटार वाहने तीन हजारवरून सहा हजार रुपये, डिझेल हलकी मोटार वाहनांवर ३५०० वरून सात हजार रुपये करवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली असून ३० सप्टेंबर २०२५ रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी समितीच्या शिफारशींनुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितले.