ठाण्यातही सुरू होता स्त्रीबीज विक्रीचा धंदा!

* ठाण्यातील आयव्हीएफ सेंटरवर कारवाई
* ११ आयव्हीएफ तसेच २५९ सोनोग्राफी सेंटर रडारवर

ठाणे: बदलापूरमधील स्त्रीबीज विक्रीचा संबंध ठाणे शहराशी असल्याचे उघडकीस आले आहे. बदलापूरच्या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या ठाण्यातील एका आयव्हीएफ सेंटरवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नुकतीच कारवाई करण्यात आल्याने ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शहरातील ११ आयव्हीएफ तसेच २५९ सोनोग्राफी सेंटर रडारवर आले असून त्यांची तपासणी मोहीम प्रशासन हाती घेणार आहे.

नाशिकमध्ये मालती आयव्हीएफ केंद्राला परवानगी देण्यात आली असताना हे सेंटर ठाण्यात अवैधरित्या सुरू होते. त्याची कोणतीही नोंदणी ठाणे महापालिकेकडे करण्यात आली नव्हती. याच केंद्रात स्त्री बीज विक्रीचा प्रकार बेकायदेशिरपणे सुरू होता. बदलापूर पोलिसांच्या कारवाईतून ही माहिती उघड होताच या केंद्रावर पोलिस आणि ठाणे पालिका आरोग्य विभागाने संयुक्त धाड टाकून कारवाई केली. तसेच ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर हे केंद्र आता बंद करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात असे प्रकार सुरु आहेत कि नाहीत याची कसून तपासणी आता पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. ठाणे शहरातील ११ आयव्हीएफ तसेच २५९ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्याबरोबरच अवैध केंद्रांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम पालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. एखाद्या आयव्हीएफ सेंटरमध्ये किंवा सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे काम सुरु असल्याचे आढळून आल्यास त्या सेंटरवर कारवाई करून ते तत्काळ बंद करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर आरोग्य विभागाकडून सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती या पथकांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सोनोग्राफी सेंटरचीही तपासणी करण्यात येणार आहे.

बदलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आता शहरातील सर्वच आयव्हीएफ सेंटर आणि सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत काही सेंटरची पाहणी करण्यात आली असून या सेंटरमध्ये अद्याप बेकायदेशीरपणे काम होत असल्याचे आढळलेले नाही. नागरिकांकडे काही माहिती असल्यास त्यांनी आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.