शिकवणी वर्गाचा स्लॅब कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू, पाच जखमी

* कोपरखैरणे येथील घटना

नवी मुंबई: कोपरखैरणे सेक्टर २ येथील विद्याभावन सोसायटी परिसरातील एका इमारतीत सुरू असलेल्या खाजगी शिकवणी वर्गाचा स्लॅब गुरुवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १२ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून यात एका विद्यार्थ्याचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला असून पाच विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन कोपरखैरणे आणि वाशी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि सुमारे १५ ते २० जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली विद्यार्थी अडकल्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जवानांनी सावधगिरीने ढिगारा हटवत शोधमोहीम राबवली आणि अडकलेल्या १२ विद्यार्थ्यांना तसेच शिक्षिकेला सुरक्षितपणे बाहेर काढले. बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. मनीष म्हसे या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांनी दिली. तिच्यासह इतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने जवळील ॲपेक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार, विद्या भवन सोसायटीतील तळ मजल्यावरील घरात सुरू असलेल्या शिकवणीत सुमारे १८ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी काही विद्यार्थी काही वेळापूर्वीच घरी निघून गेले होते. त्यानंतर काही मिनिटांतच पहिल्या मजल्याचा स्लॅबचा एक भाग कोसळल्याचे सांगितले जात आहे.

स्लॅब कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदत केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
संबंधित इमारतीचे बांधकाम १९९७ साली झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीत सुमारे आठ कुटुंबे वास्तव्यास आहेत. दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

स्लॅब कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून इमारतीच्या संरचनात्मक स्थितीची तपासणी केली जाणार असल्याचे अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी सांगितले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.