कल्याण: आंबिवलीजवळील गाळेगाव आदिवासी पाडा परिसरातील भटक्या मोकाट कुत्र्याने एका सात वर्षीय मुलाला चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडल्याचा समोर आल्याने कडोंमपा क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याच्या भितीपोटी कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आत्ता पुन्हा कल्याणनजीक मोहने गाळेगाव आदिवासी पाडा परिसरात राहणाऱ्या खुशील वाघे या सात वर्षांच्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार या मुलाचे आई-वडील मोलमजूरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खुशीलला भटका कुत्रा चावला होता. या भटक्या मोकाट कुत्र्याच्या चाव्याने गालाचा लचका काढला गेल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. खुशीलला जेव्हा कुत्रा चावला त्याचवेळी आणखीन एका मुलाला कुत्रा चावला होता. हा मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनांची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली. भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी फिरविण्यात यावी. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात यावे आदी मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.
बल्याणी चौक, उंभार्णी, मोहिली, गाळेगाव, जेतवननगर, तिपन्नानगर, आर. एस. टेकडी, मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वापर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरुन जाणारे येणारे व्यक्तींवर धाव घेतली जाते. भटक्या कुत्र्यांकडून हल्ला केला जातो. या हल्ल्यात नागरीक जखमी होतात.