नवी मुंबई: वाशी येथे महाराष्ट्र भवन उभारणीसाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामातील सर्व अडथळे दूर झाले असल्याने पुढील काही महिन्यांतच महाराष्ट्र भवन आकाराला येणार आहे.
महाराष्ट्राच्या जनतेसाठी समर्पित असलेले ‘महाराष्ट्र भवन’ हे भव्य आणि लखलखते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर आहे. या बहुउद्देशीय भवनाचे काम हे सिडको महामंडळामार्फत जलदगतीने सुरू असल्याचे नगरविकास विभागाने २४ फेब्रुवारी रोजीच्या पत्राद्वारे आमदार मंदा म्हात्रे यांना कळविले आहे.
महाराष्ट्र भवनाच्या इमारतीमध्ये तीन तळघर अधिक तळमजला अधिक १५ मजले प्रस्तावित आहेत. हा भूखंड किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये येत नसल्याने त्या संदर्भातील वैधानिक परवानगीची आवश्यकता नसून पर्यावरण विभागाची देखील मंजुरी प्राप्त झाली आहे. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देखील प्रदान करण्यात आले असून कंत्राटदाराला कार्यादेश सुद्धा देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत तीन मजल्याच्या बांधकामासाठी उत्खननाचे काम सुरू असून शोअर पायलिंगचे काम हे प्रगतीपथावर सुरू आहे. या भवनामध्ये अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त सभागृह, प्रदर्शन गॅलरी, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त व्यासपीठ अशा अनेक सोयी येथे उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र भवनाच्या दर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य बैठा पुतळा असणार आहे.