प्रादेशिक मनोरुग्णालयाने २३८४ रुग्णांना दिले नवजीवन आणि हक्काचे घर
ठाणे : ज्यांच्या आयुष्यात केवळ अंधार, विस्मृती आणि एकाकीपण होते, अशा हजारो निराधार जीवांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेची पहाट उजाडली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने औषधोपचारांच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचा हात पुढे करत वर्षभरात तब्बल २३८४ मानसिक रुग्णांना नवजीवन देत नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर हक्काच्या घरी पोचते केले आहे.
मनोरुग्णालयापेक्षा घरचे वातावरण रुग्णासाठी अधिक सुरक्षित आणि स्वीकारार्ह असते. मात्र वास्तव वेगळे आहे. अनेकवेळा अज्ञात रुग्ण असतात किंवा नातेवाईक त्यांना स्वीकारण्यास टाळाटाळ करतात व मानसिक आजारी रुग्ण घरी असणे ही समाजात अस्विकारार्ह बाब असते. अशा परिस्थितीत रुग्णांना घरी परत पाठवणे हे रुग्णालयासाठी मोठे आव्हान ठरते. तरीही जानेवारी २०२५ ते २०२६ या कालावधीत रुग्णालयाने अशा विपरीत परिस्थितीत हार न मानता २२५७ रुग्णांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा हक्काचे घर दिले. तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहत पुन्हा सामील होण्याची संधी मिळवून दिली.
या माणुसकीच्या मोहिमेत ४४ अज्ञात रुग्णांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मूळ गावी व कुटुंबात पोहोचवण्यात रुग्णालयाला यश आले. तर काही रुग्ण अनेक वर्षांपासून रुग्णालयात होते, त्यांना घरचा रस्ता देखील आठवत नव्हता. अशा ३४ दीर्घकालीन रुग्णांना डॉक्टर आणि कर्मचारी स्वतः ‘एस्कॉर्ट’ बनून सुरक्षितपणे त्यांच्या घरी घेऊन गेले. ज्यांचे कोणीही नातेवाईक उरले नाहीत, ज्यांना स्वीकारायला कोणीच पुढे आले नाही, अशा ४९ निराधार रुग्णांना सन्मानाने पुनर्वसन केंद्रात दाखल करून व त्यांना व्यवसायिकरित्या सक्षम बनवून रुग्णालयाने आपली सामाजिक जबाबदारी आणि ‘पालकत्वाची’ भूमिका प्रामाणिकपणे निभावली आहे.
मानसिक आजार पूर्णपणे बरा होतो का, याबाबत समाजात आजही गैरसमज आणि साशंकता आहे. मात्र ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय केवळ उपचारांपर्यंत थांबत नाही तर रुग्ण समाजात टिकून राहावा, स्वाभिमानाने जगावा, यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि स्वावलंबनाचे मार्ग खुल्या मनाने उभे केले जात आहेत. काम, आत्मविश्वास आणि स्वीकार मिळाला, तरच रुग्णाचे पुनर्वसन खऱ्या अर्थाने पूर्ण होते, या भावनेतून हे प्रयत्न सुरू आहेत.
मानसिक रुग्ण हे आमच्यासाठी केवळ उपचाराची ‘केस’ नाही, ती माणसं आहेत. औषधांसोबत मायेचा स्पर्श आणि विश्वास मिळाला, तर रुग्ण पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. एखादा रुग्ण बरा होऊन आपल्या घरी परत जातो, तो क्षण आमच्यासाठीही समाधानाचा आणि अभिमानाचा असतो, अशा. भावना ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांनी व्यक्त केल्या.