शहापूर रुग्णालयात अतिदक्षता विभाग नसल्याने रुग्णांची हेळसांड

शहापूर: तालुक्यातील मुख्य शासकीय आरोग्य केंद्र असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात अद्याप अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचा गंभीर मुद्दा शिवसेना शहर शाखाप्रमुख विजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे येथील उपसंचालकांना लेखी निवेदन देऊन तातडीने अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी केली आहे.

शहापूर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग, रेल्वेमार्ग, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारा रेल्वे स्टेशन परिसर याच तालुक्यात येतो. त्यामुळे रस्ते अपघात, औद्योगिक दुर्घटना तसेच नैसर्गिक आपत्तींची शक्यता कायम असते. अशा परिस्थितीत गंभीर रुग्णांसाठी आयसीयू विभाग अत्यावश्यक असताना उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या हृदयविकार, मेंदूविकार, श्वसनाचे आजार, अतिसार, सर्पदंश, अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झालेल्या माता अशा गंभीर रुग्णांना शहापूरहून ठाणे, कल्याण, नाशिक किंवा मुंबई येथे हलवावे लागते. या विलंबामुळे अनेकवेळा रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. तसेच नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून तज्ज्ञ डॉक्टर, फिजिशियन व प्रशिक्षित नर्सिंग स्टाफच्या अभावामुळे सामान्य रुग्णसेवेलाही मर्यादा येत आहेत. परिणामी गरजू व गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो, जो सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार, अपघातांचे प्रमाण वाढते.

रेल्वे व महामार्गांवरील अपघातांमुळे गंभीर जखमींची संख्या लक्षणीय असते. अशावेळी तालुक्याच्या ठिकाणीच आयसीयू उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात किमान २०० खाटांचा सुसज्ज अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करावा. यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ तसेच आधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना शहर शाखा प्रमुख विजय देशमुख यांनी केली आहे.

यावेळी तालुका सचिव रविंद्र लकडे, तालुका समन्वयक गणेश अवसरे, शिवाजी देशमुख, शिवसेना शहर प्रमुख विजय देशमुख, तालुका युवाधिकारी अतुल भालके, सचिव सुनील घोडविंदे, युवासेना शहर अधिकारी हर्षद राऊत, प्रवीण ठाकरे, प्रमोद गायकर उपस्थित होते.