प्रयोगशील शेतीच्या समृद्ध वाटचालीसाठी प्रेरणादायी पुस्तक

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष पुस्तकाचे प्रकाशन

ठाणे: शहरातील कृषी अभ्यासकांनी खेड्यात जाऊन आणि कोकणातल्या तरुणांनी गावातच राहून आपल्या मातीसाठी काम केले पाहिजे. ही प्रेरणा अनेकांना मिळावी आणि शेती प्रयोगशील राहावी यासाठी ‘अणुस्कुरा ते साखळोली आपलं कोकण स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास’ हे विशेष पुस्तक लिहिल्याचे प्रतिपादन पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांनी केले.

डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त ‘पुस्तक प्रकाशन’ कार्यक्रमाचे ठाण्यातील तृप्ती सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दा. कृ. सोमण, प्रमुख अतिथी आमदार संजय केळकर आणि विशेष अतिथी म्हणून राजश्री यादवराव, पितांबरीचे व्हाइस चेअरमन परीक्षित प्रभुदेसाई आदी उपस्थित होते.

डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांनी कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे, ताम्हाणे व दापोली येथे साकारलेल्या विविध कृषी प्रयोगांचा आढावा घेण्यात आलेले ‘अणुस्कुरा ते साखळोली आपलं कोकण स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास’ या पुस्तकाचे दा. कृ. सोमण यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच दत्ता जोशी लिखित ‘एकश: सम्पत’ या पुस्तकाचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर विवेक प्रकाशित ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ या पुस्तकाचे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या राजश्री यादवराव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

‘अणुस्कुरा ते साखळोली आपलं कोकण स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास’ या पुस्तकात कोकणात पितांबरीने साकारलेले विविध कृषी प्रयोग आणि ते साकारताना आलेल्या अडचणी, त्यावर मात करून मिळवलेल्या यशाची अद्भुत कहाणी मांडण्यात आली आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि अभ्यासपूर्ण ठरणार आहे असेही प्रभुदेसाई म्हणाले.

दा. कृ. सोमण यांनी हे पुस्तक म्हणजे कोकणातील निसर्गसौंदर्याचे आणि कृषी प्रयोगांचे दस्ताऐवजीकरण असल्याचे म्हटले. प्रभुदेसाई यांच्या कोकण प्रवासात झालेल्या त्रुटींचा उल्लेख देखील त्यांनी या पुस्तकात केल्याचे सांगितले. जेणेकरून इतरही व्यक्तींना कोकणात किंवा आपल्या गावात असे प्रयोग करायचे आहेत त्यांना यातून काही शिकता येईल. आमदार संजय केळकर यांनी रविंद्रजींवर असलेले संघाचे संस्कार व शिस्त त्यांच्या कामातून कायम जाणवते असं म्हणत त्यांच्या संघातील आठवणींना उजाळा दिला.

कोकण विकासाच्या दृष्टीने पितांबरीसारखी आस्थापने आणि रविंद्र प्रभुदेसाईंसारखे उद्योजक हे कृषी क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत असे मत राजश्री यादवराव यांनी यावेळी व्यक्त केले.

याप्रसंगी पितांबरीचे कोकणातील ४० हून अधिक सहकारी आणि कुटुंबियांचा प्रभुदेसाईंच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान प्रारंभ कला अकादमीच्या अरुंधती भालेराव आणि आशुतोष भालेराव यांनी रचलेलं, पितांबरीच्या प्रवासाची कहाणी उलगडणाऱ्या विशेष गाण्याचे यावेळी स्क्रिनिंग करण्यात आले.

दरम्यान ‘ठाणेवैभव’ने प्रकाशित केलेल्या विशेष पुरवणीचेही व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
पितांबरीच्या व डॉ. रविंद्र प्रभुदेसाई यांच्या व्यावसायिक कामांचा आढावा या पुरवणीत घेण्यात आला आहे. सतीश कोचरेकर, प्रियांका पावसकर आणि मंजिरी केळकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.