मुंबई: महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या प्रचाराला राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे पाठिंबा व्यक्त केल्याचे चित्र निकालांमुळे स्पष्ट झाले. त्याचबरोबर शहरी मतदाराची अचूक नस माहिती असलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या विचारधारेसोबत राहण्याच्या आवाहनाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे निकालांवरून दिसले.
मागील वर्षी जानेवारीत रविंद्र चव्हाण यांनी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर राज्यात दीड कोटी प्राथमिक सदस्यांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले होते तिथेच ते अर्धी लढाई जिंकल्याचे आज या दणदणीत विजयाने स्पष्ट झाले.
भाजपा हा धोरण आखणारा आणि धोरण राबविणारा पक्ष आहे. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय पंडितांनी केले आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे शीर्षस्थ नेतृत्त्व म्हणून पक्षासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखवलेली. त्यांच्या रूपाने भाजपाला रस्त्यावर उतरून आंदोलन केलेला आणि मातीशी जोडलेला कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून मिळाला. निवडणूक काळातील वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण बिलकुल विचलित झाले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. याचे कारणच कायम संघर्ष करून यश संपादन केलेला रविंद्र चव्हाण यांच्यासारखा नेता महाराष्ट्रातील जनतेने अजून नीटसा पाहिलेला वा ओळखलेला नाही आणि राजकीय निरीक्षकांनी अजून अभ्यासलेला नाही. रविंद्र चव्हाण हे अत्यंत मुरलेले आणि मुरब्बी राजकारणी म्हणून महाराष्ट्रात आजच्या भाजपाच्या विजयाने उदयास आलेले आहेत हे दिसले.