बदलापूर: बदलापूर नगरपालिकेत सहा विषय समित्यांची निवडणूक देखील बिनविरोध पार पडली आहे. आज झालेल्या निवडणुकीत सर्व सहा समिती सभापती पदे भाजपा-राष्ट्रवादी युतीकडे गेली आहेत.
नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची व स्थायी समिती सदस्यांची आज निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी भाजपच्याच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होऊन सर्व सभापतीपदे भाजपा राष्ट्रवादी युतीकडे गेली आहेत.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी भाजपाचे बदलापूर पूर्व शहराध्यक्ष रमेश सोळसे यांची, स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी भाजपाचे पश्चिम शहराध्यक्ष किरण भोईर यांची, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी भाजपाचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांची तर पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती म्हणून शैलेश वडनेर यांची आणि महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या प्रणिता कुलकर्णी यांची तर उपसभापतीपदी भाजपच्या रिद्धीता घोरपडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पदसिद्ध सभापती या नात्याने उपनगराध्यक्ष प्रियांका दामले यांची शिक्षण समिती सभापतीपदी निवड झाली आहे. स्थायी समिती सदस्यपदी भाजपाचे गटनेते शरद तेली, भाजपाचे नगरसेवक राजेंद्र धुळे व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी तर सहाय्यक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्ष प्रियांका दामले व भाजपा गटनेते तेली यांनी सर्व सभापतींचे अभिनंदन केले.