वनमंत्री गणेश नाईक पुन्हा ठरले नवी मुंबईचे नायक

नवी मुंबई: आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली नवी मुंबई महापालिका निवडणुकीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व राखल्याचे ताज्या निकालाने पुन्हा स्पष्ट झाले. नवी मुंबई मनपा निवडणूक गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी झाल्याने चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकावर तर शिंदे यांच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या मनपा निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाला जोरदार फटका बसला आहे. मनसेला मात्र प्रथमच अभिजित देसाई यांच्या रुपाने खाते उघडण्यात यश आल्याने मनसेच्या वर्तुळात पुन्हा नवी उमेद निर्माण झाली आहे. शिवसेना (उबाठा) आणि मनसेने एकत्रित जागा लढवून देखील तीन जागा जिंकल्या आहेत. एकूण ९५ जागांवर या दोन्ही पक्षांनी उमेदवार उतरवून १४ अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले होते. भाजपा, मनसे, शिवसेना (शिंदे) या पक्षातील बंडखोरी प्रत्येकी १४ नाराज उमेदवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मैदानात उतरवून आव्हान दिले होते. यापैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. एकसंघ राष्ट्रवादी असताना गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ५२ नगरसेवक निवडून आले होते. मात्र यंदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचा एक देखील उमेदवार निवडून आला नाही. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून नेरूळ येथे निवडणूक लढवली. मात्र त्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी निवडणुकीच्या काळात काँग्रेसची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यावर बेलापूरमधून त्या निवडून आल्या असून नामदेव भगत यांच्या त्या पुत्री आहेत. या निवडणुकीत वडील हरले आणि मुलगी जिंकली आहे.

दिघा व ऐरोली परिसरात उपनेते विजय चौगुले यांनी सलग तिसऱ्यांदा आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. स्वतः विजय चौगुले मुले शुभम चौगुले, मामित चौगुले, मुलगी चांदणी चौगुले या एकाच कुटुंबातील चार जणांनी निवडणूक जिंकली आहे. भाजपाला दिघा, ऐरोली आणि घणसोली परिसरात फटका बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी त्यांच्या संपूर्ण बहुसदस्य प्रभागात चारही उमेदवार शिवसेनेचे जिंकून आणल्याने त्यांचा प्रभाव वाढला आहे.

कोपरखैरणे परिसरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या शिवराम पाटील त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांनी विजय मिळवला असून त्यांच्या सुनेला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
तुर्भ्यातील शिवसेनेचे (शिंदे) सुरेश कुलकर्णी यांनी सून व स्वतः विजय मिळवला असला तरी त्यांच्या मुलाला महेश कुलकर्णी यांना प्रभाग चौदामधून पराभव पत्करावा लागला आहे. भाजपमधील ऐरोली परिसरात माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, माजी सभागृह नेते अनंत सुतार यांना देखील पराभव पत्करावा लागला आहे. ऐरोली परिसरातील तुरुंगातून निवडणूक जिंकण्याची ख्याती असणारे मनोहर मढवी यांच्या पत्नी विनया मढवी आणि मुलगा करण मढवी यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांनी नुकताच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मतदानाच्या आदल्या रात्री तरुणांना मारहाण केल्यावर पोलिसांशी हुज्जत घातल्याने मढवी कुटुंबियांना मतदानाच्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

कल्याण-शीळ फाटा परिसरातील चौदा गावातील मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर ही निवडणूक महत्वाची ठरली. या प्रभागात अपक्ष भरत भोईर यांनी विजय मिळवला मात्र धनुष्यबाण निशाणीवर लढणाऱ्या त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. भाजपाच्या लक्ष्मण पाटील यांच्या सुनेने त्यांचा पराभव केला. या ठिकाणी भाजपाचे तीन तर अपक्ष असा कौल मतदारांनी दिला आहे. तूर्भ्यात एकहाती वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले होते.मात्र त्यांचा पराभव झाला असून त्यांच्या पत्नी कविता पाटील, भाजपाच्या पुतणी शुभांगी पाटील यांचा विजय झाला आहे.

चौकट
एकूण प्रभाग-२८
एकूण जागा-१११
भारतीय जनता पार्टी-६५
शिवसेना-४२
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)-०२
महाराष्ट्र नवनिर्माण सेना-०१
अपक्ष-०१