सॉफ्टवेअर यंत्रणेत चुकीचे पत्ते; घोडबंदरमध्ये मतदारांमध्ये गोंधळ

ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणूक कामातील घोळ काही कमी होण्याचे नाव घेत नाही. नवीन ठाणे असलेल्या घोडबंदर भागातील मोठमोठ्या गृहसंकुलातील मतदारांच्या घराचे पत्ते भलतेच टाकण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट, ब्राह्मण्ड, ऋतू पार्कसह या भागातील मतदार यादीमधील नावांच्या पुढे असलेल्या घराच्या पत्त्याचा घोळ झाला आहे. मतदार यादीतील क्रमांक आणि नाव बरोबर छापण्यात आले आहे, परंतु पत्ता मात्र चुकीचा छापळल्याचे अनेक जणांनी ‘ठाणेवैभव’ला फोन करून सांगितले.

विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी स्लीप वाटल्या आहेत. त्यामध्ये मतदान केंद्र, त्याचा पत्ता आणि मतदाराचे नाव बरोबर असले तरी मतदाराच्या घराचा पत्ता मात्र चुकीचा टाकल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. स या चुका मुद्दाम करण्यात आल्या कि नजर चुकीने झाल्या याबाबत मतदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

याबाबत हिरानंदानी येथे राहणारे प्रदिप राव यांनी सांगितले कि माझ्या घराचा पत्ता वेगळाच दाखविण्यात आला आहे. इतर सर्व माहिती बरोबर आहे. ओळखीचा पुरावा सादर करताना पत्ता बरोबर नसेल तर मतदान करता येईल की नाही याची चिंता असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि महापालिका कर्मचाऱ्यांनी वाटलेल्या वोटर स्लिपवरील पत्ता लोकसभा आणि विधानसभा मतदार संघातील मतदार यादीप्रमाणे असून मतदार यादीत नाव असेल तर त्या मतदाराला मतदान करता येणार आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाटलेल्या वोटर स्लिपमधील माहितीबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.