राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत भाजप असतानाच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांना गाळ्यात ओढले असून त्यांच्या सहकार्याने शिवसेना सत्तेचे सुकाणू आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसला हा ‘जोर का झटका’ असल्याचे बोलले जात आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेससोबत अंबरनाथ विकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या चार नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला समर्थन दिल्याने भाजपाच्या तोंडातून सत्तेचा घास हिरावून घेतला आहे. शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपसोबत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केल्याने काँग्रेसमधून निलंबित झालेले १२ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहत होते. एका रात्रीत भाजप आणि काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांचे सत्तेचे हे स्वप्न धुळीला मिळाले आहे.
शिवसेनेचे २७ नगरसेवक आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे चार आणि एक अपक्ष अशा एकूण ३२ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून सत्ता स्थापनेची रणनीती आखली आहे. शिवसेनेच्या या खेळीमुळे काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नगरसेवकांसाठी हा धक्का मानला जात आहे. कारण काँग्रेसने निलंबित केलेल्या १२ पैकी ११ नगरसेवकांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश देऊन शिंदे सेनेला सत्तेपासून रोखले होते. त्यामुळे भाजपचे १४ नगरसेवक, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आणि एक अपक्ष असे मिळून ३१ नगरसेवक या संख्याबळाच्या जोरावर अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु होत्या. मात्र ऐनवेळी शिवसेनेने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेने नगराध्यक्ष पद गमावले असले, तरीही पारंपरिक बालेकिल्ला अबाधित ठेवला आहे.
नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर एक अपक्षाच्या साथीने शिवसेनेचे संख्याबळ २८ झाले होते. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला दोन नगरसेवकांची आवश्यकता असताना राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी १२ जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या अंबरनाथ विकास आघाडीचा उपनगराध्यक्ष बसेल अशी व्यूहरचना आखली असताना शुक्रवारी गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि त्यांच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिल्याने उपनगराध्यक्ष पद शिवसेनेच्या गोटात राहणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
अंबरनाथची निवडणुक झाल्यानंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वत: फोन करुन तुम्ही उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव सुचवा, आहे सांगितले आणि तसे आश्वासन देखील दिले. त्यानुसार आम्ही तयारी देखील केली. परंतु आम्हाला गाफील ठेवून त्यांनी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन आमचा घात केला, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.