शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध
नवी मुंबई: नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा सविस्तर आराखडा शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आज मांडण्यात आला. पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, पुनर्विकास, पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक डिजिटल प्रशासन या मुद्द्यांना या जाहीरनाम्यात अग्रक्रम देण्यात आला आहे.
वाशीतील अबॉट हॉटेलमध्ये नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता शिवसेनेने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी शिवसेना नेते विजय नाहटा, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, महिला जिल्हाप्रमुख शीतल कचरे उपस्थित होत्या.
जाहीरनाम्यानुसार नवी मुंबई येथे पासपोर्ट कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करणे, स्वतंत्र व्हिसा कार्यालय उभारणे, नवी मुंबई विमानतळ–मेट्रो कनेक्टिव्हिटी, मानखुर्द ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प तसेच सायन पनवेल मार्गावरील तुर्भे खारघर टनेल या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. अटल सेतू, वाशी खाडी पूल आणि ऐरोली दिवा एलिव्हेटेड ब्रिजमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा वेळ व चत होत असल्याचेही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
एम्सच्या धर्तीवर भव्य रुग्णालय, स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल, साथीच्या गांसाठी विशेष रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालयांचे आधुनिकीकरण आणि महिलांसाठी आरोग्य तपासणी व्हॅन्स सुरू करण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय, युडीसीपीआरमधील सुलभ नियम, क्लस्टर पुनर्विकास योजना, सिडको वसाहतींसाठी स्वतंत्र पुनर्विकास कक्ष आणि झोपडपट्टी व प्रकल्पग्रस्तांसाठी एस आर ए सारख्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.