मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

आगरी समाजात संताप

ठाणे: ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवार मीनाक्षी शिंदे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह आणि
खालच्या पातळीवर टीका केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ठाणे पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटात झालेल्या बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणूक आता चर्चेचा विषय बनली आहे. याच प्रभागातून निवडणूक लढवत असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक कथित ऑडिओ क्लिप आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. या ऑडिओ क्लिपमध्ये मीनाक्षी शिंदे यांनी थेट आगरी समाजाला उद्देशून अपमानास्पद शब्द वापरला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे आगरी समाजात तीव्र नाराजी पसरली असून त्यांच्या या वक्तव्याचा आगरी, कोळी समाजाकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे.

ठाकरे गट आणि मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समाजाच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी ठाकरे गटाच्या महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, मनसेच्या ठाणे शहर अध्यक्ष समीक्षा मार्कडे आदी उपस्थित होते. मॉर्फ तसेच एआयची ऑडिओ क्लिप म्हणणे हे हास्यास्पद असून मीनाक्षी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काहीच संबंध नाही, तो आवाज माझा नाही. मॉर्फ तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून जातीमध्ये तेढ निर्माण केली जात असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले.