भाईंदर: पंजाब पोलीस दलाचे निवृत्त आयजी अमरसिंह चहल यांच्या सुमारे आठ कोटींच्या सायबर फसवणुकीचे सूत्रधार भाईंदरमध्ये आढळून आल्याने पंजाब पोलीस नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले.
मीरा-भाईंदर शहरात सायबर गुन्ह्यांचे जाळे खोलवर रुजू लागले आहे. वर्षभरात ऑनलाईन सायबर फसवणूक, नोकरीचे आमिष दाखवून तसेच ठराविक ठिकाणी पैसे गुंतवून रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून खात्यातून पैसे गायब केल्याचे बरेच प्रकार समोर आले आहेत. मीरारोडमधील काही सायबर चोरांनी पंजाब पोलीस दलातील एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले असून मीरा-भाईंदरमधून चार जणांना अटक केली आहे.
पंजाब पोलीस दलातील निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल यांची काही सायबर चोरांनी आठ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. पण, पंजाबमध्ये घडलेल्या या फसवणुकीचे धागेदोरे थेट मिरारोडशी येऊन जुळले आहे. या फसवणुकीप्रकरणी मीरारोडमधील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी पंजाब पोलिसांचे पथक मीरा-भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
ऑनलाईन फसवणुकीमुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या अमर सिंह चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ऑनलाईन फसवणुकीमुळे माजी आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले असून सायबर फसवणूक प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.