नववर्षाच्या पूर्वसंध्येला २२४ वाहनचालकांसह १२ जणांना दंड
नवी मुंबई: सरत्या वर्षाला निरोप देताना कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचा आवाहन, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले होते. तरी देखील काही जणांनी पोलिसांच्या आवाहनाला धुडकावत कायद्याचे उल्लंघन केले. नवी मुंबई शहरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 451 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देत येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेत आनंद साजरा करण्याचे आवाहन, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केले होते. यासाठी संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत तब्बल 2500 पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यापैकी परिमंडळ 1 मध्ये 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 15 पोलीस निरीक्षक, 63 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, 262 पुरुष अंमलदार तर 60 महिला पोलिस अंमलदार तैनात करण्यात आले होते. यामध्ये नाकाबंदी, पेट्रोलिंग पथक, विशेष शाखा, गुन्हे शाखा, हे सर्व पथक या उत्सवावर बारीक नजर ठेवून होते. यावेळी सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करणारे 21 सार्वजनिक ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थाचा वापर करणारे 20, बेकायदेशीर मद्यविक्री करणारे तीन इसम, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे 38 इसम, एनडीपीएस नुसार 17, मद्यप्राशन करून वाहन चालवणारे 55 इसम, तसेच वाहन कायद्यानुसार 250 आणि इतर अशा एकूण 451 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.