थर्टी फर्स्ट आणि नववर्षाचे सेलिब्रेशन पोलिसांच्या रडारवर

मद्यपी चालकांवर करडी नजर

ठाणे: यंदा मनपा निवडणुक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात ५४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतुक शाखेचे ७३९ इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.

थर्टी फर्स्ट व नववर्ष स्वागता सोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण-डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभुमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतुक शाखेमध्ये ५९ अधिकारी व ६८० कर्मचारी असे एकुण ७३९ इतके मनुष्यबळ तैनात केले आहे. आयुक्तालय क्षेत्रात एकुण ५४ ठिकाणी वाहतुक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजणोली नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून घोषित केली आहेत. या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

यंदा २०२५ या वर्षात लोक अदालतमध्ये एक लाख ४२,६०७ ई चलन कारवाई करण्यात आली असून एकुण १४ कोटी ३४ लाख ४३,२०० रुपये इतका दंड वाहन चालकांनी न्यायालयात भरणा केला आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ९४५ ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची प्रकरणे झाली तर, डिसेंबरमध्ये ६४६ प्रकरणे झाली आहेत. यामध्ये ५१ ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे चालकांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. ड्रंक अँड ड्रॉइव्ह करणारे आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.

थर्टी फर्स्ट आणि २०२६ च्या स्वागतानिमित्त बार, हॉटेल, धाबे, पब, फार्महाऊस यासह निसर्गरम्य ठिकाणे, मनोरंजन पार्क आदीच्या संचालकांना मद्यपी चालकांविषयी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीकरीता उमेदवारी अर्ज भरताना, वाहनांवरील ई चलन दंड थकीत असू नये, असा नियम आहे. ई चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे पेंडिंग ई चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबग सुरूच आहे. आजपावेतो ३१० उमेदवारांनी थकीत ई चलनापोटी तब्बल ११ लाख ५०,५५० इतका दंड जमा केला आहे. यात ठाणे १०४, उल्हासनगर ८, भिवंडी ११७ आणि कडोंमपा क्षेत्रातील ८१ उमेदवारांनी थकीत ई चलान भरले आहेत.