विरार येथे पालिकेची जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्गालगत असलेल्या विरार फाटा येथे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पाण्याचे उंचच उंच फवारे उडत होते. यामुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विरार फाटा येथून वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणारी सुर्या योजनेची जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यातून दररोज शहरात पाणीपुरवठा होतो. मात्र मंगळवारी सकाळी अचानकपणे व्हॉल्व्ह लिकेज होऊन उच्चदाबामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याचे २० ते २५ फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.

या घटनेची माहिती वसई-विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला मिळताच लिकेज झालेला व्हॉल्व्हमधून होणारा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. त्यानंतर युद्धपातळीवर त्या ठिकाणी दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.