रॅपिडोचे ४७ बाईक टॅक्सी चालक ताब्यात

कल्याण: कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मोटार वाहन कायद्याचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी कल्याणच्या हद्दीत विना परवाना व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ‘रॅपिडो’  कंपनीच्या 47 दुचाकी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
कल्याण आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, मोटार वाहन कायदा १९८८ च्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाईक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. कल्याण आणि आसपासच्या परिसरात आवश्यक व्यावसायिक परवान्याशिवाय बाईक टॅक्सींच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
​उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितले की, व्यावसायिक प्रवासी वाहतुकीची परवानगी नसलेल्या या बाईकस्वारांकडून एक लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांकडून सातत्याने येत असलेल्या तक्रारींमुळे या कारवाईला वेग आला.
​आरटीओने केवळ वैयक्तिक चालकांवरच नव्हे, तर या बेकायदेशीर कामात गुंतलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या खासगी कंपनीवरही कठोर कायदेशीर पाऊल उचलले आहे. मोटार वाहन निरीक्षक सुप्रिया गावडे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ‘दि रुपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ (रॅपिडो) आणि तिच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.
​गुन्ह्याच्या नोंदीनुसार, कंपनी जानेवारी २०२५ पासून व्यावसायिक परवान्याशिवाय ऑनलाइन नोंदणीद्वारे प्रवाशांना सेवा पुरवत होती. हे कृत्य बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीच्या कक्षेत येते आणि यामुळे सरकारी महसूलाचेही नुकसान झाले. आशुतोष बारकुल यांनी स्पष्ट केले की, मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ६६ नुसार, रॅपिडो  सह ओला  आणि उबर  सारख्या सर्व खासगी कंपन्यांना दुचाकी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यापूर्वी व्यावसायिक परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यांनी सांगितले की, परवानगीशिवाय पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्स प्रवासी सेवेसाठी वापरणे हा कायद्याचा स्पष्ट भंग आहे आणि विहित नियमांची पूर्तता केल्यानंतरच अशा कंपन्यांना कायमस्वरूपी परवाने दिले जातील.