वडाळा-गायमुख मेट्रोचे डिसेंबरमध्येच लोकार्पण

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

ठाणे: वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला मेट्रो-४ या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून याच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचा आमचा मानस असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

शुक्रवारी घोडबंदर भागातील विविध विकासकामा संदर्भातील आढावा बैठक ठाणे महापालिकेत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, महापालिका, एमएमआरडीए, मेट्रो, वाहतुक नियंत्रण शाखा, परिवहन विभाग, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री.सरनाईक यांनी मेट्रोबाबत माहिती दिली.

वडाळा-घाटकोपर ते गायमुख असा मेट्रो -४ प्रकल्प कधी सुरु होणार याची सर्वानाच प्रतीक्षा आहे. मेट्रो-४ हा मार्ग मुंबईहून तीनहात नाकामार्गे घोडबंदरला जोडण्यात आला आहे. पूर्वी कासारवडवलीपर्यंत हा मार्ग होता. मात्र त्यांनतर त्याचा विस्तार करून पुढे गायमुखपर्यंत या प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला.

ज्या-ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर आले आहेत त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या वतीने नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी मेट्रो स्टेशनवरून जेव्हा खाली उतरतील तेव्हा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुविधा देखील मिळणार आहे. या ठिकाणी रिक्षा, एसटी आणि परिवहन बसेसला उभे राहण्याची परवानगी देण्यात आली असून खाजगी वाहनांना मेट्रोच्या ठिकाणी थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

घोडबंदरवरील जोड रस्त्यांना असमन्वयाचे अडथळे

घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यापैकी सेवा रस्ता मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र ठाणे महापालिका प्रशासन आणि मेट्रो यांच्यात समन्वय नसल्याने रस्ते जोडणी कामात अडथळे निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही बाब उघडकीस आली आहे.

एमएमआरडीएकडून कापूरबावडी ते गायमुखपर्यंत रस्ते जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे अपघातांची भीती व्यक्त करून स्थानिक नागरिकांनी विरोध केला असला तरी या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याचा दावा प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना सेवा रस्ता मुख्य रस्त्यात जोडण्याच्या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी विचारणा केली. त्यावेळी महापालिकेकडून घोडबंदर भागात ठिकठिकाणी अमृत योजने अंतर्गत कामे सुरु आहेत. तसेच मेट्रो प्राधिकरणाकडूनही काही कामे शिल्लक आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळा येत असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर ज्याठिकाणी कामे झाली आहेत. तेथील रस्त्यावर काम एमएमआरडीएला करता येऊ शकते असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला.

यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा पण तसे चित्र दिसत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना एक व्हाॅट्सॲप समूह बनविण्याच्या आणि सतत संपर्कात राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ५ जानेवारीपर्यंत अमृत योजनेची कामे पूर्ण होतील असे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. तर मेट्रोची कामे देखील लवकरच पूर्ण होण्याचे आश्वासन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर हा प्रकल्प १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या.

घोडबंदरमध्ये तिसरे नाट्यगृह

राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर अशा दोन नाट्यगृहांबरोबरच आता ठाण्यात नवीन तिसरे नाट्यगृह घोडबंदर येथील गायमुख परिसरात उभे राहणार आहे. या नाट्यगृहाचे भूमिपूजन येत्या १६ डिसेंबरला करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सरनाईक यांनी विविध विकासकामांच्या उदघाटनाची घोषणा केली असून या सर्व विकासकामांची उदघाटने देखील १६ डिसेंबरला करण्यात येणार आहे अशी माहिती सरनाईक यांनी यावेळी दिली.