पॅनल पध्दतीमुळे मतदानाचा उत्साह; मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

बदलापूर: बदलापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. शहरातील बहुतेक सर्व ठिकाणी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.

नगराध्यक्ष पदासह २४ प्रभागांसाठी ४९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. मतदान यंत्रावरील बटन तीन वेळा दाबून मतदान करावे लागले. निवडणुकांसाठी भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंतिम टप्प्यातील सभांमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. या उत्साहाचे प्रतिबिंब मतदान केंद्रांवरही दिसले. सकाळपासूनच बहुतेक केंद्रांवर जागेअभावी रांगा रस्त्यावर आणि वसाहतीपर्यंत वाढल्या. यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. काही केंद्रांवर मतदार यादी तपासण्यास विलंब होत असल्याने रांगा आणखी लांबल्या.

दरम्यान, मतदान केंद्राबाहेर १०० मीटर प्रतिबंधित क्षेत्रातही काही ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांशी संवाद साधत असल्याची दृश्ये दिसली.

यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि ‘अ’ व ‘ब’ पॅनेलमधील दोन नगरसेवकांसाठी असे तीन वेळा बटण दाबावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांचा गोंधळ होत होता. मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया समजावून सांगितल्यामुळे मतदारांना मदत झाली, तरी वेळेचा विलंब टळला नाही. तरीही या सर्व अडचणींवर मात करत बदलापूरकरांनी लोकशाहीचा उत्सव मनापासून साजरा केल्याचे आजच्या मतदानातून स्पष्टपणे दिसून आले.

आज झालेल्या मतदानाच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाचा हक्क बजावला, त्यांनी देखील १० वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मतदान करायला मिळाले म्हणून आनंद व्यक्त केला.