उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाभार्थ्यांचे साकडे
ठाणे: कोकण मंडळ म्हाडामार्फत विविध योजनेतील ५३५४ सदनिका आणि ७७ भुखंडांची संगणकिय सोडत नुकतीच ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. त्यात चितळसर-मानपाडा ठाणे येथील सदनिकांचे दर हे मार्केटपेक्षा जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या हक्काच्या स्वप्नातील घरांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार असल्याचे दिसत आहे.
म्हाडाची सोडत लागल्याने घराचे स्वप्न साकार होणार असल्याचा आनंद गगनात मावेना, परंतु प्रत्यक्ष साईटवर जाऊन घराच्या किमती पाहता लाभार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या इमारतीलगत असलेल्या महावीर स्क्वेअरमधील ४७० चौ.फु. घराची किंमत एक कार पार्किंग, क्लब हाउससहित प्रति चौ.फु.रु. १६,५०४ रुपये इतका दर आहे. “युनिक व्हिस्टा, चितळसर मानपाडा, ४४० चौ.फु. घराची एक कारपार्किंग, क्लब हाउस सहित प्रति चौ.फु.रु. १७,३७० रुपये इतकी आहे. तथापि कोकण मंडळाच्या यापूर्वी सात महिन्यापूर्वी निघालेल्या लॉटरीमधील या प्रकल्पाच्या लगत असलेला प्रकल्प महावीर स्क्वेअरमध्ये ४२९ चौ.फु.घराची किमत १४,९१,४००,/- इतकी होती. म्हणजेच प्रति चौ.फु. ३७०९ रुपये इतकी होती तर दुसरींकडे आता म्हाडाच्या या प्रोजेक्टमधील ३१२ चौ.फु. घराची किंमत ५१ लाख ८३,९८० रुपये इतकी म्हणजे प्रति चौ.फु. १६,६१५ रुपये इतकी प्रचंड असल्याचे सांगत लाभार्थ्यानी या घरांवर पाणी सोडण्याची वेळ आल्याची खंत बोलुन दाखवली आहे.
खाजगी बिल्डरच्या घराच्या किंमतीपेक्षाही म्हाडाची घरे महाग असल्याची व्यथा लाभार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली असुन माफक दरात घरे उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.