माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचे नाव आघाडीवर
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना अद्याप वेग आला नाही मात्र नगराध्यक्ष पद महिलांसाठी राखीव असल्याने आणि थेट नगराध्यक्ष निवडण्यात येणार असल्याने सर्वपक्षीयांतून नगराध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. यामध्ये माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरु आहे.
अंबरनाथचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला गटातून निवडले जाणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी २००० साली राष्ट्रवादीतर्फे निवडून आलेल्या अनिता भोईर या इच्छुक असून त्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापती होत्या. २०१५ साली त्या भाजपाकडून निवडून आल्यानंतर त्यांची भाजपा गटनेतेपदी निवड झाली होती. २०२० साली भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आणि त्यानंतर दोन वर्षे कल्याण जिल्हा भाजपा सचिव म्हणून काम पहिले आहे.
खेर विभागातून शिवसेनेतर्फे निवडून आलेल्या वीणा उगले या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून दोन वेळा त्यांनी सभापती पद भूषवले होते. त्याचप्रमाणे भाजपाच्या नगरसेविका आणि सभापती अनिता आदक, माजी सभापती अपर्णा भोईर, जोत्स्ना भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस अश्विनी पाटील, (अजित पवार गट), अंजली राऊत (ठाकरे सेना), ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील आणि माजी सभापती करुणा रसाळ-पाटील (काँग्रेस), कल्याण शिवसेना उप जिल्हा संघटक (शिंदे गट) मीना वाळेकर यादेखील इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या माध्यमातून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वपक्षीय महिला नगराध्यक्षा होण्यासाठी इच्छुक आहेत.
अंबरनाथमध्ये १९९५ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्राबल्य असून विद्यमान उप मुख्यमंत्री आणि तत्कालीन संपर्कनेते एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चार वेळा नगरसेविका आणि अडीच वर्षे नगराध्यक्ष पदाचा मान मिळालेल्या मनिषा वाळेकर यांचे नाव सोशल माध्यमांवर सध्या आघाडीवर आहे. नगराध्यक्ष पदाच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता, संभाषण कला, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव, सर्वपक्षियांबरोबर सलोख्याच्या वातावरणात शहर विकास साधण्यात आलेले यश यामुळे त्यांचे नाव अग्रेसर असल्याची चर्चा आहे.