शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने खावडा ट्रान्समिशनचे काम बंद

वाडा: वाडा तालुक्यातील चांबळे गावात खावडा ट्रान्समिशन कंपनीने शेतकऱ्यांच्या जमिनीतून जबरदस्तीने विद्युत मनोरे उभारणीचे काम सुरू केल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला.

या प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे विद्युत मनोरे जात असून, आजपर्यंत या मालकांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. त्यामुळे उर्वरित 13 एकर शेतीचेही मोठे नुकसान होणार असल्याने आता या जागामालकाने करायचे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून कोणतीही सकारात्मक चर्चा न होता थेट मनोरे उभारणीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असून त्यांनी एकमुखाने काम बंद पाडले आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही तीव्र नाराजी असून, शेतकऱ्यांच्या हक्काचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.