भारतीय महिला क्रिकेट संघ इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर

नवी मुंबई आज एका ऐतिहासिक क्षणाच्या प्रतीक्षेत आहे. दशकानुदशके ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वर्चस्वानंतर, महिला क्रिकेटच्या विश्वात आज अखेर एक नवा विजेता जन्म घेणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका, ज्यांनी या स्पर्धेत दिग्गज संघांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली, आता सुवर्णाक्षरांनी नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे.

भारत, 2005 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत, इतिहासाचं आणि त्याचसोबत अब्जावधी लोकांच्या आशांचं ओझं घेऊन मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2023 आणि 2024 मध्ये त्यांनी टी-20 विश्वचषकात विजयाच्या दाराशी पोहोचूनही पराभवाचा सामना केला होता. त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर सलग तिसऱ्या वर्षी आयसीसी स्पर्धेच्या फायनलचे तिकीट कापले. हे नशीब नाही, ही जिद्द आहे; पराभव झटकून पुढे जाणाऱ्या संघाची खूण आहे.

जितका आवश्यक आणि महत्वाचा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रत्येक सदस्यासाठी हा विश्वचषक जिंकणं आहे तितकाच संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्यासाठी. एकेकाळी डोमेस्टिक क्रिकेट गाजवणारे मुंबईचे मुजुमदार, ज्यांना कधी भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्याकडे प्रशिक्षक म्हणून इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे. आजचा दिवस त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवस असू शकतो.

आणखी एक मुंबईकर, जेमिमा रॉड्रिग्जची कहाणी सर्वात प्रेरणादायी आहे. 2022 विश्वचषकातून वगळली गेली, या स्पर्धेत सुरुवातीला दोन ‘डक’ नोंदवले, एका सामन्यात स्थान गमावलं — पण उपांत्य फेरीत तिने शतक झळकावून, गतविजेते ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि जगाला आठवण करून दिली की ती भारतीय संघाचा अविभाज्य घटक आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत जवळपास समान वाटचाल करत आले आहेत. दोघेही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यांत पराभूत झाले, आणि नंतर त्याच संघांवर उपांत्य फेरीत विजय मिळवला. दोघांचेही आधारस्तंभ त्यांच्या प्रमुख फलंदाजांवर आहेत — भारतासाठी स्मृती मानधना आणि दक्षिण आफ्रिकेसाठी लॉरा वूल्वार्ड्ट. दोघांकडेही तरुण ‘फिनिशर्स’ आहेत — रिचा घोष आणि नादिन डी क्लर्क — ज्यांचा स्ट्राइक रेट 130 पेक्षा जास्त आहे. डावखुरे फिरकीपटू — श्री चरणी आणि नॉन्कुलुलेको म्लाबा — यांनी जवळपास समान विकेट्स घेतले आहेत. अष्टपैलू खेळाडू — दीप्ती शर्मा आणि मारिझान काप — यांनी प्रत्येक प्रसंगी झुंज दिली आहे. अनुभवी मधल्या फळीतील फलंदाज — कर्णधार हरमनप्रीत कौर आणि माजी कर्णधार सुने लिस — या दोघींनीही निर्णायक क्षणी अर्धशतकं ठोकून संघाला विजयी केलं.

हा केवळ एक अंतिम सामना नाही, तर या दोन्ही संघांच्या प्रवासाची कहाणी आहे. दोन संघ ज्यांनी एकत्र वाढ केली, एकत्र पराभव पाहिले, आणि पुन्हा उभं राहणं शिकवलं.

2017च्या एकदिवसीय विश्वचषकात जेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली त्यानंतर भारतीय महिला क्रिकेटच्या बातम्या ‘फुटनोट्स’मधून हेडलाईन्समध्ये रूपांतरित झाल्या. आज जर विजय मिळाला तर भारतीय महिला क्रिकेटकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. तसेच विश्वचषक जिंकून, भारतीय महिला क्रिकेट संघ, हजारो-लाखो मुलींना क्रिकेट केवळ आवड म्हणून नाही तर करिअर म्हणून बघण्याची प्रेरणा देईल. जसं पुरुषांनी 1983 मध्ये भारतीय क्रिकेटचं रूप पालटलं, तसं 2025 हे वर्ष महिला क्रिकेटच्या नव्या क्रांतीचं प्रतीक बनू शकतं — अशा क्रांतीचं, जिथे मुली बॅट-बॉल उचलतात, बूट बांधतात, आणि स्वतःवर विश्वास ठेवतात.

आज संपूर्ण भारत, आणि जगभर पसरलेले भारतीय क्रिकेटप्रेमी, एका आवाजात एकच प्रार्थना करतील — आपल्या महिला क्रिकेट संघाने आज विश्वचषक जिंकावा! म्हणूनच, अब्जावधी हृदयं आज एकाच तालात धडकतील — भारताच्या विजयासाठी!