भारताने शेवटचा आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य सामना 2017मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता, आणि तो दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. कारण त्या वेळी हरमनप्रीत कौरच्या 171 नाबादच्या अफलातून खेळीने तेव्हाच्या सहा वेळच्या विजेता ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर काढले. त्या पराभवाचा घोट ऑस्ट्रेलियासाठी गिळणं फारच अवघड ठरलं.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्या सामन्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास केला, प्रत्येक तपशीलाचे विश्लेषण केले आणि संघरचनेत मोठे बदल केले. अॅलिसा हिलीला सलामीला बढती देणे हा त्याच बदलांचा एक भाग होता. आणि त्यानंतर या संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली.
परंतु 2017 हा त्यांचा पहिला उपांत्य सामना नव्हता. या दोन दिग्गजांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पहिल्यांदा आमने-सामने येत 1997मध्ये भारतात लढत दिली होती. त्या वेळी ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला. याच दोन संघांनी 2005च्या अंतिम फेरीत ही सामना केला होता, आणि तेव्हाही ऑस्ट्रेलियाच विजयी ठरले होते, त्यांचा पाचवा किताब पटकावत.
आता गुरुवारी नवी मुंबईत दोन्ही संघ पुन्हा एकदा उपांत्य फेरीत भिडणार आहेत. पावसाने अडथळा आणला नाही, तर मैदानावर आतषबाजी निश्चित आहे.
साखळी सामन्यांत हे दोन संघ विशाखापट्टणममध्ये आमने-सामने आले तेव्हा धावांची मेजवानी होती. 650 हून अधिक धावा झाल्या. भारताने 330 धावांचा डोंगर उभारला होता, पण हिलीच्या 107 चेंडूत 142 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीन विकेट राखून आणि एक षटक बाकी असताना विजय मिळवला.
या स्पर्धेत भारताने नवी मुंबईत आधीच दोन सामने खेळले आहेत, पण ऑस्ट्रेलियासाठी या मैदानावर पहिलाच सामना आहे. भारताने येथे शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला तेव्हा त्यांनी तब्बल 340 धावा केल्या होत्या. त्यावेळी स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या दोघींच्या शतकांनी संघाला भक्कम सुरुवात दिली होती.
मात्र या वेळी भारताची सलामी जोडी नवी असेल. प्रतिकाच्या दुखापतीमुळे ती स्पर्धेबाहेर पडली असून, तिच्या जागी शेफाली वर्माला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. डोमेस्टिक टी-20 स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केल्यानंतर ही हरयाणाची तडफदार फलंदाज आता उपांत्य सामन्यात निर्णायक भूमिका बजावणार आहे. स्मृती-शेफाली ही जोडी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 44च्या सरासरीने धावा करते, आणि भारताला या जोडीकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.
भारतीय फलंदाजी रुळावर दिसत असली, तरी गोलंदाजी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 250 पेक्षा जास्त धावा करूनही विजय मिळवू शकला नाही. तिन्ही सामने जवळपास शेवटच्या षटकापर्यंत गेले, पण भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतासाठी सहाव्या गोलंदाजाचा अभाव ही मोठी समस्या ठरली आहे.
शेफालीच्या समावेशासह एक बदल तर नक्कीच असेल. आणखी फेरबदल होण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ पुन्हा पाच मुख्य गोलंदाज घेऊन मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेत अथक, अचूक आणि अपराजित दिसला आहे. शानदार अष्टपैलू, घातक फिरकी आक्रमण आणि कोणत्याही परिस्थितून संघाला विजय मिळवून देणारे लक्षणीय खेळाडू, हे त्यांच्या यशाचे कारण आहे.
गेल्या दोन सामन्यांत त्यांची कर्णधार मैदानावर नव्हती, पण या निर्णायक उपांत्य सामन्यात अॅलिसा हिली पुनरागमन करणार आहे. आणि तिच्या आवडत्या प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध परतण्यापेक्षा चांगला क्षण कोणता असू शकेल!
दोन कर्णधार, दोन दिग्गज, दोन संघ आणि एक अपूर्ण कथा. हरमनप्रीत विरुद्ध हिली. आणि जेव्हा या दोघी टॉससाठी मैदानावर येतील, तेव्हा आश्चर्य वाटू नये, जर हिलीने हसत-हसत हरमनप्रीतच्या खिशात डोकावून पाहिलं, की ती चुकून 2017ची ती डर्बीची खेळपट्टी सोबत घेऊन आली आहे का!
आमने-सामने
एकूण: भारत – 11, ऑस्ट्रेलिया – 49
भारतात: भारत – 5, ऑस्ट्रेलिया – 23
विश्वचषकात: भारत – 3, ऑस्ट्रेलिया – 11
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: भारत – 3, ऑस्ट्रेलिया – 1
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 30 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: डॉ. डी व्हाय पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार