तन्वी घारपुरे, यश ढेंबरे, तनय जोशी यांना सुवर्ण पदके!
ठाणे: अहिल्यानगरच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये नुकत्याच महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर अजिंक्य पद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सुमारे 30 जिल्ह्यातील हजारभर मुलामुलींनी 15 व 17 वर्षे वयोगटात एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरीच्या गटात तसेच मुलामुलींनी सांघिक स्पर्धेत सहभाग नोंदवला.
सर्वप्रथम मुलांच्या सांघिक स्पर्धेत ठाण्याच्या मुलांच्या संघाने रौप्यपदक पटकावले. त्यांना अंतिम फेरीत पुण्याच्या संघाकडून २-० असा पराभव स्वीकारावा लागला. १७ वर्षाखालील या मुलांच्या संघात यश सिन्हा, यश ढेंबरे, तनय जोशी, मोहित कांबळे, अपूर्व दवाडते, कृत्या पटेल या खेळाडूंचा समावेश होता. खुल्या स्पर्धेत मुलांच्या दुहेरीच्या गटात ठाणेकर यश ढेंबरे व तनय जोशी या जोडीने सुवर्णपदक पटकवतांना आपल्या कामगिरीने सर्वांवर छाप टाकली. त्यांनी अंतिम फेरीत सयाजी शेलार (पुणे) व उदयन देशमुख (संभाजीनगर) यांना २१-१०, २१-०९ असे हरवून पराभवाचा धक्का दिला.
ठाण्याची उगवती बॅडमिंटनपटू तन्वी घारपुरे हिने पुण्याच्या ओजस जोशीला साथीला घेत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत सार्थक नलावडे (संभाजीनगर) व दितीशा सोमकुवार (नागपूर) यांचा २१-११, २१-१६ असा सनसनाटी पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले. मात्र यश ढेंबरेला १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये एकेरीमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याचा उपांत्य फेरीत अवधूत कदम (पुणे) कडून १४-२१, ९-२१ असा पराभव झाला.